Archive

Archive for the ‘वर्णन’ Category

जोडे आणि पादुका

भलतंच बोलताय राव तुमी !

अहो, आम्ही जातीवंत आहोत ! तुम्ही काय आम्हाला आता महाराष्ट्राची परंपरा शिकवणार काय ? आम्ही तर नुसते उचललेत, तुम्ही नाही का डोक्यावर घेऊन नाचता ? हां आता थोडी गल्लत झालीय आमची जोडे आणि पादुकात !!

संकलन स्नेह-मेळाव्याचे


खरोखरीच कालचा स्नेह मेळावा हा आम्हा मराठी ब्लॉगर्स च्या एकुण कालखंडात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा नव्हॆ लिहिला  जाईल हे काल उपस्थित असलेल्या अनेकांनी भेटून व त्यांच्या चेहेऱ्या वरील भावावरून सहज रित्या समजून येत होते. जे कोणी येऊ शकले नाहीत ते चुटपुटले, त्यांनी नंतर आपली हळहळ ही व्यक्त केली. पण अनेक जण जे स्नेह मेळाव्याला उपस्थित होते ही बघा त्यांनी केलेली काही चतुर्वैसत्यम वर्णने. मी इथे फकत त्यांना संकलीत केलॆ आहे.

सुरेश पेठे


इथे ऑर्कुट वरील फोटोची लिन्क

अनिकेत

पंकज

विक्रांत देशमुख

प्रभास गुप्ते


वैभव

हरेकृष्णजी

नीरजा पटवर्धन


अभिजित पेंढारकर
Media मंच , मधॆ वाचा
विनायक पाचलग चा लेक …… मेळाव्यानंतर..

तन्वी मस्कत हून इतरांच्या डोळ्यातून पहात !

म्हणूनच ठरवलं की मी आज जे वर्णन करणार आहे ते म्हणजे ह्या कार्यक्रमा मागिल पडद्या मागच्या हालचाली.

खरी ह्याला सुरुवात झाली ती माझ्या दावणगिरी डोस्यावरील पोस्ट वरून अनिकेत, अजय, तन्वी, अपर्णा ह्यांच्या भांडणावर मी एका कवितेतून उत्तर दिले तेव्हा पासून !


त्यावरून मी एकदा सहज म्हणून अनिकेत ला फोन केला. तेव्हाच आम्ही एकमेकाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आपण दोघेच का आपण सगळ्यांनाच बोलावू या ना, एखादी पोस्ट टाकूया त्या साठी !  त्याची सम्मती कळली व लगेच  मी एक पोस्ट तयार करून व पु. ल. देशपांडे उद्यान ही जागा ही ठरवून टाकली. आणि १७ जानेवारी हा दिनांक कायम केला. अगदि सुरुवाती पासून प्रतिसादांचे रतीब सुरू झाले, सुरुवातीला हा  कट्टा बनतोय की काय शंका आली. परंतू नंतर मात्र प्रत्येकाला त्याची निकड आहे ह्याची जाणीव झाली व नंतर प्रतिसादांचा तर अक्षरश: पाऊस पडला. ही च ती पोस्ट ज्यावर १२१ प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्यात.

मग एकदा अनिकेत ची गांठ घेतलीच ….. आपल्या ब्लॉगर्स मधला हा पहिला भुणभुणणारा भुंगा मी प्रत्यक्ष पाहिला व  पकडला !! तो पर्यंत मी मेळाव्याला येतोय म्हणणाऱ्यांची गर्दी वाढू  लागलेली होती. आम्हाला आणखीन सहाय्यकांची जरूर लागणार असे फक्त मनात विचार येण्याचा अवकाश.. विक्रांत, भुंगा, पंकज  असे ….नव्या दमाचे सहाय्यक बाह्या सरसावून पुढे आले. मग काय गेल्याच शनिवारी ९ जानेवारीला आम्ही बालगंधर्व च्या कॅंटीन मधे जमलो. अजून नवे तीन सहकाऱ्यांची प्रत्यक्ष गाठ व साथ मिळाल्यावर आमची अशी ही ” हम पाच ” ची पंचकडी तयार झाली !
सर्व कार्यक्रमाची रूपरेषा  मिनिट तू मिनिट आखून लिहून घेतली. ऐन वेळी कुठलीही गडबड होऊ द्यायची नाही. एव्हढा मोठ्ठा जमाव ( आम्हाला , निदान मलातरी तशी स्वप्ने पडू लागलेली होती ) जमणार तेव्हा कार्यक्रम वेळेवरच सुरू हवा हा कटाक्ष होता. जमावाला कंटाळा वाटू नये त्याचे आत तो संपवणे हेही बंधन कारक होते. शिवाय मधल्या काळात तॊ वाहवत जाणार नाही हे पहाणे तितकेच निकडीचे झाले. फोटॊ, विडीयो वगैरे प्रत्येक बारिकसारीक गोष्टीची आंखणी झाली. कामे वाटून घेतलीत. व सर्व कार्यक्रम सफाईदार पणॆ पार पडावा अशी इच्छा मनी धरली.
आता मात्र मी एकटा वा आम्ही पाचच नाहीत आपण सर्व आता आमच्या  बरोबरीने आहात. एव्हढॆच सांगेन की नजीकच्या कालावधीत आपण खूप  काही महत्वाचे व दूरगामी परिणाम घडवणारे निर्णय घेणार आहोत त्यासाठी तयारीत रहा..

खास तन्वी साठी !

हा ब्लॉग खास तन्वी साठी आहे. पण असे असले तरी माझे सर्व मित्र मंडळी ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात बरं का !
मी ही आठवण सांगत आहे त्यावेळी मी असेन बहुदा चवदा किंवा पंधरा वर्षांचा, माझ्या बगलेत आहे सर्वोदय माझा पुतण्या ( जन्म १९५६ ) तर मागे उभी स्वाती माझी पुतणी ( जन्म १९५२ ).
आता जो फोटो मी येथे पोस्ट केला आहे, ती ’ती’च गच्ची आहे जिथे तन्वी, मी तुझ्या आईलाही घेऊन येत असे ,,, काळही तोच असावा.( आई चा जन्म कधीचा ? ) फोटोत माझ्या पुढे जो ओटा आहे त्याचे बरोबर खाली कापसे कुटुंबीय म्हणजे तुझी आज्जी रहायची ( हा दुसरा मजला… म्हणजे मुंबईच्या भाषेत 1st floor ). गच्ची तून  खाली उतरायला एक जीना होता व पुढे दिड – दोन फुटाची गॅलरी / पॅसेज तिन्ही बाजूने जेथून खालील चौक ( २०’x२०’) दिसे व परत मोठ्या जिन्याने खाली चौकात येता येत असे. हा मागिल दारचा चौक, असाच पुढील दारी पण होता ! मधे मग पडवी , मधले घर, ओसरी असे, ज्या ओसरीत मोठा झोपाळा होता.
परत फोटो कडे वळतो. तॊ जरा निरखून पहा. तिथे छोटी छोटी मॉडेल्स केलेली आहेत. दोन वा तीन मजली घरे, बाल्कनी असलेली, रस्ता आहे, कॉर्नरचे गोल घर, आहे की नाही छोटी टाऊन्शिप ? तिथे एसटी बस पण आहे , सर्वात मागची लांब बिल्डींग आहे बहुदा सीबीएस ची…त्या पुढे मोटारी !…… गच्चीला मधेच मोठ्ठी थोरली गॅप पडलेली दिसते आहे का?….. ती आहे मधून जाणारी नदी !…. त्यावर एक छोटा पूल ही केलेला आहे बरं का , वर एक मोटार…..दिसतंय का सारे?…. त्यावेळी फोटोग्राफी इतकी adavance  नव्हती… साध्या बॉक्स कॅमेरावर काढलेला आहे हा फोटो.

हा फोटो आहे माझ्या आईचा, श्राध्दाचे लाडू वळतांनाचा…. येथे देण्यचे प्रयोजन ? हे आहे आमचे स्वैपाकघर. त्यावर कापसे कुटुंब राहायचे. डव्याबाजून अर्ध्या भागाचे वर जाळी होती व त्यापुढे होता चौक.

आता हा फोटॊ आहे रंगपंचमीचे दिवशीचा. रंग खेळून झालेला आहे. बजूला आहेत ती सर्व माझी भाचे मंडळी ! मी चौदावा ना…भाचे ही जवळपास माझ्याच वयाचे असणार.

येथे हा फोटो देण्याचा उद्देश… हा आहे चौक, मागे जाळी त्यामागे आमचे स्वैपाक घर व त्यावर रहायची, तन्वी तुझी आज्जी !

पुढे ह्या माझ्या छंदाने मला वेळेला थोडा पैसाही मिळवून दिला, त्याचे वर्णन पुन्हा कधीतरी करीन.

अश्शी नाती !

11/12/2009 8 commentsहो परवा म्हणजे नउ डिसेंबर ला मी दिप्ती च्या गृहमुखाला औरंगाबाद येथे गेलो होतो. कोण ही दीप्ती ? …. तो एक मोठ्ठा किस्साच आहे ….एखाद्या सिनेमात शोभावा अस्सा !

तेव्हा मी नोकरीत होतो. त्या वर्षीचा एल.टी.सी. संपवायचा होता. रजाच मिळत नव्हती. अगदि शेवटच्या क्षणी ती मंजूर झाली. मी रिझर्वेशन साठी स्टेशन वर गेलो. त्यात नाताळची सुटी आणि इतका उशीर झालेला … बंगलोर मनात असूनही नाईलाज होता. फक्त सिकंदराबादचे रिझर्वेशन चालू होते. पण विचार करण्यात वेळ घालवला असता तर ……तर पुन्हा नकार घंटाच ऐकायला मिळाली असती … क्षणाचाही विलंब न करता आमची चार तिकीटे मी आरक्षित केली. घरी येऊन सांगीतले तर सारे जण नाराज ! ( तेव्हा जे बंगलोर जमले नाही ते नंतर जांवयाने त्यांच्या कार मधून नेऊन आणवले !) हे ठिकाण विशेष नावाजलेले, माहीतीचे नव्हते.  सहसा ठीकाण  माहीततले  असल्या शिवाय ट्रीप साठी कोणी जात नाहीत,…. पण नाईलाज असल्याने … केले मान्य एकदाचे सर्वांनी ! आणि   १९७८-७९ चा एल. टी.सी घेऊन आम्ही एकदाचे सिकंदराबादला पहाटे पहाटे पोहोचलो ! सूर्योदय होऊ पहात होता. गाडी संथ वेगाने स्टेशनात पोचली. आम्हालाही घाई अशी नव्हती. नव्या गावाची माहीतीही नव्हती ! हमालावर भिस्त ठेवून एखाद्या चांगल्या हॉटेलात नेण्याची व्यवस्था करण्यास विनवले. त्यानेही इमानेइतबारे स्टेशनच्या बाहेरील एक दोन हॉटेल्स दाखविलीत व एका मध्ये आम्ही  रूमवासी झालोत. सकाळची आन्हीके उरकलीत, नास्ता जेवण झाले थोडीशी विश्रांतीही झाली.

नंतर मग नकाशा उघडला, चारमीनारला जायला डायरेक्ट बस आहे असे कळले. थोडेसे शोधून बस मधे  बसलो. जातांना वाटेत बिर्ला मंदीर लागते असे सहप्रवाश्यांनी सांगून त्याचे छान आहे म्हणून वर्णन केले.  तेव्हा उतरलो व ते बघीतले. पूर्ण संगमवरातील मंदीर ही अलिकडल्या काळातील एक अजोड कलाकृती आहे. मूर्तीही अत्यंत सुंदर आहेत. एकूण स्वच्छ परिसर बघून प्रसन्न वाटले. परत बस स्टॉप वर आलॊ. दुसरी बस करीत चारमीनारला आलो…. वेगवेगळी तिकीटे काढली असती तर पैसे वाचले नसते का?… वगैरे बायकी टोमणे मारून झालेत !! पण आधी हे ठीकाण माहीत असते तर तसेच केले नसते का … वगैरे सामोपचाराच्या गोष्टी होत चारमीनार आले. अर्थात मुसलमानी आर्कीटेक्चर चे कौतुक झाले ! मला मात्र ते कधीच पटलेले नाही ! कै. पु. ना. ओकांनी कितीही कंठशोष करून पुरावे देऊन सांगून ही लोकांना ते पटतच नाही त्याला काय करणार. त्यांनी तर स्वच्छच सांगीतलेल्रे आहे. अगदी ताजमहाला सकट  मुसलमानांनी  येथे येऊन नवीन काहीही बांधले नाही, केली ती फक्त तोडाफोडी, लुटालूट, बायका पळविणे आणि हिंदूंची मानहानी होईल असे सर्व काही. अर्थात सरकार दरबारी ते मान्य पावण्याची सुतराम शक्यता नाही… जाऊंदे तो राजकारणाचा विषय आहे  व आत्ता तो इथे अप्रस्तुत आहे !

चारमीनार बघीतला बाजूचे बाजार पाहीलेत, किरकोळ खरेदी, खादाडी झाली आणि आल्या मार्गाने परत जाण्यासाठी बस मध्ये बसलो. बसने परतीचा मार्ग आक्रमायला सुरूवात केली. आमच्या आपसात गप्पा चालू होत्या. आजुबाजुचे तेलगुत बोलत होते. आम्ही चौघेच मराठीतून बोलत होतो. काही अंतर गेल्यावर आमच्या मागेच उभा असलेला एक कॉलेज तरूण मुलगा अस्खलित मराठीत आम्हाला विचारू लागला…. तुम्ही मराठी का ? कोणत्या गावाहून आलात वगैरे चौकश्या सुरू झाल्यात. त्याने स्वत:चीही माहीती सांगायला सुरूवात केली….अरूण नाव होते त्याचे…तो मराठीच पण अनेक वर्षे इथे काढली आहेत …मग त्याचा व्यवसाय रहाता कुठे ह्या माहीतीची देवाणघेवाण झाली ! तो आम्हाला लॉज पर्यंत सोडायला आला. सुलतान बाजारात हिरवी मशीद आहे त्याचे मागे रहात होता व उद्या रिक्षाने घरी यायचे आमंत्रण देऊन तो त्याचे घरी परतला.

मग आमच्यात गप्पा सुरू झाल्या… एव्हढी माहीती कशाला दिलीत … कोण कुठला माहीत नाही आपल्याला. शंका तर माझेही मनात होती…. उद्या जायचेच का त्याचे घरी?  इ, इ,….  तो उद्या फोन करणार होता तेव्हा उद्या फोन आलाच तर बघुया जायचे  का नाही ते ….अशी समजूत घालीत , विषय कसातरी संपवला. दुसरे दिवशी त्याचा फोन आलाच ! येण्या बाबतच्या सुचना पुन्हा देऊन झाल्यात तेव्हा आम्ही जायचे निश्चित केले ! मग त्याने सांगीतल्या प्रमाणे रीक्षावाल्यास पत्ता  सांगून बसलॊ. अंतर थोडे जास्त होते पण रीक्षावाल्याने बरोबर आणले. अरूण ही स्वागताला हजर होताच.

आम्हाला घेऊन तो घरी घेऊन आला. हिरव्या मशीदीला अगदी खेटून एक बोळ आहे तेथून आत गेल्या गेल्या शेजारचाच वाडा त्याचा होता !  दोघांमध्ये मधली भिंतच कॉमन !  वाड्यात मात्र सर्व बिऱ्हाडे मराठी बोलणारांची त्यामुळे पुण्यातल्याच एखाद्या वाड्यात शिरल्याचा भास झाला. घरात सगळ्य़ांच्या ओळखी – भेटी झाल्या ! घरी रीटायर्ड वडील होते,सगळे मामा म्हणत त्यांना , आई, आत्या म्हणून म्हणतात सारे त्यांना, बहीणीने माहीती पुरवली, मोठा भाऊ दादा, वहिनी ह्यांचे नुकतेच लग्न झालेले ! दोन बहीणी ,दुसरी इंटर स्टेट खोखो का कबड्डी खेळणारी म्हणून कुठेल्याश्या टुर्नामेंटस साठी बाहेरगावी गेलेली होती. अजून एक भाऊ आहे तो नोकरी निमित्त मुंबईत असतो. त्या बहीणीशी वंदना, आमच्या मुलींची ओळख व्हायला वेळ लागला नाही….. आत्यांनी माझ्या मुलींना जवळ येण्या साठी हांक मारली आणि ,”बसा भेंडीची भाजी आवडते का तुम्हाला ? ” लगेच पोटातच शिरल्या ! मुलींना तर काय भेंडीची भाजी आजही जीव की प्राण , धाकटी तर सात-आठ वर्षांची, अमिता चार वर्षाने मोठी बसल्या की फतकलं मारून ! आत्या एकदम जवळची झाली त्यांची !!

तेथून पुढे वंदना झाली मावशी,  दादा ,अरूण झालेत मामा, अजून एक मुंबईचा भाऊ प्रकाश त्याची जरा नंतर ओळख झाली तो बनला मुलींचा ’ परकर मामा ’. एक अख्खे कुटुंब दुसऱ्या शी जोडले जात होते ! पुढे वंदनाचे लग्न तिचा भाउ प्रकाश व आम्ही जमवले ह्याचाही एक  अनामिक आनंद मिळाला. वंदना पुण्यात रहायला आली. दोन कुटुंबातली येणी जाणी वाढलीत. धाकटी बहीण कल्पना  तिचेही  लग्न पुण्यात केले. दोन्ही भावाच्या लग्नाला आम्ही हैदराबादला गेलेलो होतो. अजून एक पुढला एल. टी. सी. हैदराबादलाच घेतला गेला !! एव्हढेच काय माझ्या सासू-सासऱ्यांनाही हैदराबादची सहल करवून आणली.

हे मी एक दोन प्यारात वर्णिले आहे पण त्या मागे गेल्या तीस वर्षांचा इतीहास आहे. मामा आता आमच्यात नाहीत. आत्या वय पंच्यायशी पण अजूनही  सगळीकडे  चौफेर लक्ष आहे ! सगळ्यांची लग्ने झालीत त्यांची मुले मोठाली झालीत. आता ही दिप्ती म्हणजे म्हणजे त्या  वंदनाचीच मुलगी ! तिचे लग्न ही लवकरच पुण्यात व्हायचे आहे. एक मोठ्ठा घरगुती सोहळा पार पडला ! तिच्या गृहमुखाला परवा आम्ही सर्व जण जमलो होतॊ !

मला वाटते ही नाती आधीचीच जुळलेली असावीत देवाच्या दरबारी ! आता पहा ना, तन्वी शी असेच एक नाते इंटरनेट मुळे जुळून आले !

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

30/11/2009 4 comments

   

असे आहे  आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

 

बजरंग बली कि जय !!

 

रोज सकाळी माझे स्केच बुक काखोटीला मारून हिंडायला जाण्याचा माझा शिरस्ता आहे. आम्ही १५ ते १६ ज्येष्ठ नागरिक एम.आय.टी. कॉलेज मधील हनुमानाच्या देवळाच्या पुढील बाकड्यांवर रोज सकाळी .३० ला जमतो. येथे येणारे साधारणत: साठी उलटलेले पासून ते नव्वदी कडॆ झुकलेल्यां पर्यंतच्या वयाचे असतात. त्यात ठिकठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले असल्याने गप्पामध्ये , अनुभवात विविधता असते. मी मात्र श्रवणाचे काम करीत असतो ! आमच्यातलेच एक , त्यांनी आता डॉक्टरीपेशा सोडून गायनाचा क्लास लावलेला असल्याने हे व्यासपीठ गायना साठीही वापरले जाते ! मग त्यांचे बरॊबर इतर काही जण आपलाही घसा साफ करून घेतात !  

  

आठ वाजले की सगळ्यांनाच निघायची घाई होते ! मग सारे हनुमानाच्या समोर जमतात व भीमरूपी स्तोत्र सर्व जण तारस्वरात म्हणून हनुमानाला प्रार्थना अदा करतात.

 

 
 
 
 येथून आमचा जथा हलत डुलत अण्णा कडे येतो.
 
 
 

  

निघालेत अण्णाकडे !

   

 इथेही मनसोक्त गप्पा चालूच असतात. अण्णा कडे मग चहाची फैर झडते ! अण्णा ला माहीत असते तो त्या ज्येष्ठा कडे जातो त्याने मागितले की मुकाट्याने अण्णाचे चहाचे बिल भरले जाते ! त्या नंतर आम्ही गप्पा हाणीतच आपापले घरी जातॊ.    

त्यामुळे असा हा  सकाळचा रम्य वेळ चुकवायचा म्हणजे तर माझ्या जीवावर येते ! माझा ह्या घोळक्यातील उद्योग वेगळाच असतो मी ह्या साऱ्यांना माझ्या स्केच बुकात बंदिस्त करीत सुटतो तेही निमुटपणे माझ्या स्केचिंगची शिकार व्हायला एका पायांवर तयार असतात !    

ही आहेत मी तेथे काढलेली स्केचेस !   

   

   

   

   

   

   

   

ही आहेत आमची सर्व मंडळी

   

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ !    

.   

नाशिकचा मुरलीधर- श्रीकृष्णजन्मोत्सव !

29/11/2009 2 comments
गेल्या १३ ऑगष्ट २००९ रोजी रात्री श्रीकृष्णजन्म झाला. माझे मन एकदम माझ्या बालपणीच्या त्या रम्य आठवणीं मधे रमून गेले. नाशिकला सरकार वाड्यासमोरील कापड बाजारात अगदि नदीच्या तोंडाशी बालाजीचे मंदिर आहे व त्याच्या समोरच्याच गल्लीत एक मुरलीधराचे मंदिर आहे. तसे अगदि रस्त्यावर नाही, थोडेसे आत आहे आणि नाशिकच्या नियमाप्रमाणे नदी कांठची घरे उंच जोत्यावर असल्याने गल्लीच्या तोंडापासूनच बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते. म्हणजे तेव्हा त्या आम्हाला तश्या वाटायच्या. ते देवस्थान एका वाड्यात्च सामावलेले आहे. आम्ही जवळच पलिकडल्या गल्लीत रहात असल्याने जाता येता केव्हाही दर्शनासाठी तेथे जात असू. श्रीकॄष्णाष्टमीच्या आधी आठ दिवसांपासूनच हा श्रीकृष्णजन्मोत्सवाचा सोहळा सुरू होत असे. दररोज मुरलीधराला एकेका वाहानावर बसवले जाई. ह्या छाया चित्र संगहात ती सर्व रूपे आपणांसाठी मुद्दाम खुली करून देत आहे त्याच्या दर्शनाचा आपणासही लाभ घेता यावा ही ईच्छा ! ……. सुरेश पेठे

ह्या फोटोतील मुरलीधराची मूर्ती मूळ  पांढऱ्या शुभ्र संगमरवराची आहे. उंची अंदाजे अडीच फूट आहे. मूर्ती उभी असून , उजवा पाय मोडपून डाव्या पायावरून नेलेला, मान किंचीत वाकलेली,  पाणीदार डोळे , मुरली वाजवीत असतानाची अशी आहे. ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावर अतिशय गोडवा आहे. मी तरी इतकी सुंदर मूर्ती आजवर पाहीलेली नाही. बिर्ला मंदिरातल्या काही श्रीकृष्णाच्या मूर्ती सुंदर आहेत पण तरीही ह्या सम हीच ! ह्या उभ्या मूर्तीला वाहनांवर बसवताना, पायांची घडी कशी घातली जात असेल ? हा प्रश्न त्यावेळी आमच्या बालमनापुढे कायम पड असे.  पुढेही कित्येक वर्षे तो होता ! श्रावणीच्या वेळी मी ह्या मूर्तीला स्पर्श करीत पंचामृताने स्नान घातलेले आहे,   ह्याचा आनंद काय वर्णावा ?

वरील फोटोत मुरलीधराला अर्धनारी नटेश्वरा च्या रूपात साकारले आहे. जरा नीट निरखून त्यातील बारकावे पहा. एकीकडे व्याघ्राजिन पांघरले आहे  तर दुसरीकडे पैठणी  नेसवली आहे !  उजवीकडे भरगॊस मिश्या तर डावीकडे नाकाच्या चाफेकळीवर सुबक नथ ! गंध, केस. इतर दागिने…अगदि रेलचेल आहे !  आहे की नाही गंमत ! अधिक निरखून पहाल तर  डोळ्यांतील भाव सुध्दा प्रत्येकाच्या स्वभावा नुसार वेगळे आढळतील .

इथे मुरलीधर बनला आहे राधा ! तिचा तो पुढे घेतलेला शेपटा पहा त्यावर फुलांची वेणी पण घातली आहे ! हल्ली मुलींना लांब केसच नसतात की आयांना आवरायला वेळच नसतॊ… श्रीकृष्णच जाणे ? सगळ्याचेच केस लांडे लांडे !!  साडी बघा कशी चापून चोपून नेसवली आहे ! नाकात नथ, कमरेला कमरपट्टा, पायात पैंजण ,हातात घड्याळ ही असायचेच ! अशी ही बावरी राधा  कोणाची वाट पहात असणार ? काय तिचा तो थाट  !

आता मुरलीधराला नागावर बसवले आहे.  कालिया मर्दनानंतरतो नमल्यावर त्याने आपणहून बसू दिलेलॆ दिसत्येय ! पायाकडे लक्ष गेले असेलच ! आत्तापर्यंत उभा असलेला असा कसा बरं बसला ? आम्हाला लहानपणी ह्याची खूप गंमत व अप्रूप वाटायचे ! पुढे थोडे मोठे झाल्यावर  आमच्या बाल गणपती उत्सवात मी ही एका उभ्या गणपती ची स्थापना करायचॊ व त्याला दहा दिवसात निरनिराळ्या वाहनांवरून सफर करून आणायचो !

ह्या वरील फोटोत  दिसतोय तो मुरलीधराचा नेहमीचा पोषाख ! कधीही गेलं तरी प्रसन्नच वाटावे असे हे ध्यान !

इथे मुरलीधर गरुडावर बसला आहे ! गरूडाने पायात नागाला पकडलेले आहे ! गरूड सुध्दा किती रुबाबात आहे , त्यालाही भान आहे आपण कोणाला पाठीवर घेतले आहे ते !

कशी शांत झोपाळ्यावर बसून बांसरी वादनात तल्लीन झाली आहे स्वारी ! गालातील हंसू स्पष्ट दिसतंय , काय राधाबाईंच्या आगमनाची वाट पहाणे चालू आहे वाटतंय ! काहीतरी मस्करीची युक्ती मनात घोळत असलेली दिसत्येय !!

ह्या फोटोत मुरलीधर चंद्रा वर बसला आहे ! आता आम्ही सुध्दा चंद्रावर जाण्याच्या तयारी आहोत ! पण असं आम्हाला तिथे बसता येईल ?

ह्या फोटोत मुरलीधर मोरा वर बसला आहे

ह्या फोटोत मुरलीधर  बनला आहे, त्याच्या लहान पणीचा जिवलग,   पेंद्या !  डोक्यावर घोंगडे,  हातात काठी , सभोवती आजु बाजूला गायी चरत आहेत.

आपला,
सुरेश पेठे
प्रवर्ग: वर्णन