Archive

Archive for the ‘माझे छंद’ Category

माझ्या रांगोळ्या

रांगॊळी बाबत मला कुठलाही पूर्व अनुभव नव्हता. मला माझ्या वयाच्या मैत्रिणीं बरोबर कधीही वावरता आलेले नाही ! त्या मुळॆ रांगॊळी ह्या त्यांच्या विशेष प्रांतात मला कधीच डोकावता आलेले नाही ! माझी आई व ’मोठ्ठी’ बहीण ( माझा पहिला भाचा माझ्याहून चार वर्षांनी मोठा होता ! ) ह्यांना पण कधी रांगोळ्या काढतांना पाहीलेले  नाही. त्यामुळॆ माझी ती भूक राहूनच गेली.
मी १९५८ साली नाशिकच्या पेठे विद्यालयातून अकरावी एस.एस.सी. पास झालॊ. मी पुढे काय करायचे ह्यावर घरात खूप चर्चा चालत असे. माझ्या मनात मुंबईला जे.जे. मध्ये चित्रकलेचा डिप्लोमा करावा अशी खूप इच्छा होती. पण शेवटी हो ना करत मी पुण्याला सिव्हिल इंजीनीयरींग डिप्लोमाला प्रवेश घेतला ! पण मूळ आवड काही जाईना ! चित्रकलेची प्रदर्शने पहाणे एव्हढेच तेव्हा शक्य होते. शिवाय शाळेत माझे चित्रकला शिक्षक डोंगरे सर ह्यांनी काय पाठ गिरवून घेतले होते ती एक शिदोरी जवळ होती ! तेव्हा रांगोळीची प्रदर्शने गोखले हॉल कींवा टिळक स्मारक मध्ये नेहमी होत असत ! मी ती अर्थातच पहायला चुकवित नसे.
आता त्याला पंचेचाळीस – पन्नास वर्षे लोटलीत अश्याच एका प्रदर्शनाचे वेळी थोडे आधी मी तेथे पोहोचलो. उदघाटनाला अवकाश होता. चित्रकार मंडळी रांगॊळी चित्रांवर अखेरचा हात मारीत होती. मी ते पहात राहीलो. थोडावेळ तेथेच घुटमळत राहीलो. आता मला नक्की आठवत नाही पण नाही तो काटेच होता. माझ्याहून थोडा अधिक वयाचा असावा. मी त्याला गाठलेच. त्याचे काम संपलेले होते म्हणून तो गप्पांच्या मूड मध्ये होता. वेळही होता. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. अधून मधून इतरांना ही मदतीचा हात देत होता. आणखी काही जणांच्या ओळखी करून दिल्यात. तो नंतर एकदा माझ्य रूमवर पण आला. माझी काही चित्रे त्यानी पाहीलीत. त्याकाळात तो माझा चांगला मित्र बनला होता. पुढे माझी बदली झाली. माझ्या अनेक गोष्टी बंद झाल्यात त्यात रांगॊळीही बंद झाली, तशी आमची मैत्रीही संपुष्टात आली. आता तो कुठे असतो चौकशी करायला पाहीजे !
काटे मुळे माझा ह्या ग्रुप मधे शिरकाव झाला. त्या ग्रुप मध्ये एक सर्वात लहान शाळकरी मुलगा होता ! कॊण असेल? सध्याचा प्रसिध्द चित्रकार व लेखक श्री सुहास बहुलकर ! त्या वयात सुध्दा त्याची चित्रकलेची समज अव्वल होती. रांगॊळी तर अप्रतीम असायचीच व तो आमच्या ग्रुप चा बाल हीरॊ होता. आता तो खूप मोठ्ठा चित्रकार झालेला आहे. अजून माझी त्याची गांठ पडलेली नाही पण पुन्हा ओळख व्हायला हा दुवा चांगला उपयोगी पडेल. ह्या ग्रुप बरोबर मी अनेक प्रदर्शनातून भाग घेतलेला होता. त्यातील काहींचे फोटो व वर्तमान पत्रात आलेली कात्रणे व ढिग भर आठवणी ह्यांची मला आता सोबत आहे !

हे एका नर्तकीचे रांगोळीतले चित्र आहे.

हे आहेत महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहीलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक

ह्या रांगोळीची एक कहाणी आहे. माझी त्यावेळी जयपूर येथे बदली झालेली होती. तेथील महाराष्ट्र मंडळाचा कसलासा कार्यक्रम होता व त्या कर्यक्रमास स्वत: वसंतराव नाईक हजर रहाणार होते. मला रांगोळी येते म्हटल्यावर ते काम माझ्यावर सोपवले गेले. मी जवळ जवळ दोन-अडीच तास खपून ही रांगोळी काढली. सगळ्यांनी माझे कौतुक केले. मुख्यमंत्री यायला अर्धा तास होता … पण…..माझी मोठी मुलगी अमिता, असेल दिड दोन वर्षांची ….आई तिला घेऊन मागून आली व काही क्षणांचे दुर्लक्ष … ती जी दुड दुड धावत आली ती सरळ रांगोळीवरूनच !…सगळ्य़ा मेहनती वर पाणी फिरले ! लगेचच ती फरफटली गेलेली रांगोळी झाडून पुसून टाकावी लागली. ….फक्त त्याआधी मी फोटॊ काढून ठेवलेला होता. तेव्हढाच पुरावा राहीला.
महर्षि धोंडो केशव कर्वे
छत्रपती शिवाजी महाराज
ही रांगोळी प्रसिध्द चित्रकार दिनानाथ दलाल ह्यांचे चित्रा वरून आमच्या कॉलेजच्या गॅदरींग ला काढली होती.
चित्रपट महर्षि व्ही. शांताराम

अशी आहे आमच्या रांगोळीची चित्तरकथा

प्रवर्ग: माझे छंद टॅगस्

स्केच

02/12/2009 2 comments

स्केच आत्ता पर्यंत आपण माझ्या

http://sketching-bysureshpethe.blogspot.com/

ह्या ब्लॉग वर स्केचिंग बद्दल माझ्या मनातील विचार , कल्पना व इतर प्रथितयश चित्रकारांचे म्हणणे ही वाचलेत. मध्यंतरी काही कारणाने ह्या ब्लॉगवर पोस्टींग करणे थांबले होते. आता ते पुन्हा शक्यतो नियमीत देण्याचा मी प्रयत्न करीन. शिवाय आता काही प्रात्यक्षिक ही दाखवण्याचा प्रयत्न असेन. आपण त्यास भरभरून साथ दिलीत तर मला हुरूप येईल.

हा आराखडा आहे.

आज येथे मी एक व्यक्ती चित्रण दाखवित आहे. हे पहिले चित्र म्हणजे प्राथमिक आराखडा आहे. ज्याचे स्केच काढायचे आहे त्या कडे अर्धा किंवा एक मिनिट निरखून पहा व त्यातील वैशिष्ठ्ये आपल्या मनात साठवण्याची संवय लावून घ्या ! त्यात काय काय पहाल ? त्या वस्तूचा बाह्य आकार, त्यातील ठळक भाग व त्याचे एकमेकांशी असलेले प्रमाण व मग ते जितक्या झटपट कागदावर रेखाटता येईल तितके रेखाटा. पुन्हा त्या वस्तू कडॆ पहा , क्षणभर डोळे मिटा व ते चित्रावर रोखून उघडा. काढलेल्या रेखाटनाशी ताडून पहा. आवध्यक तेथे फेरफार करा. खोडरबर वापरण्याची खोड आत्तापासून्च सोडून द्या. रेषा काढतांनाच त्या अस्पष्ट काढा म्हणजे खोडायचा प्रश्न उद्भवणार नाही. हे पहिल्याच प्रयत्नात जमेल असे नाही. मात्र निराश न होता आपला सराव सतत , रोजच्या रोज चालू राहू द्या. त्या साठी सुरवातीला स्थिर वस्तूंचा वापर करा. हा ही एक रियाजच आहे. घ्या बरं हातात पेन्सिल आंइ सुरू करा !

हे चित्र जवळ जवळ पुर्ण करीत आणले आहे

आता हे चित्र आहे ते स्केच पूर्ण केल्या नंतर. येथे मला जो जो वस्तू चा ( येथे व्यक्तीचा ) भाग अगदी ठळक व स्पष्ट दिसत आहे तेव्हढ्याच भागाला मी स्पर्श केलेला आहे.