Archive

Archive for the ‘माझे छंद’ Category

मुळशी जवळ

काल गुरूवार होता. माझे अजून एक स्नेही मला विचारते झाले व मीही होकार भरला, अन गाडी आम्हाला घेऊन सकाळी सातलाच पिरंगुट कडे निघाली. श्री. रवी देव हे अखिल भारतीय संस्कार भारतीचे मंत्री आहेत व चित्रकलेतही माहीर. गेल्या सहा वर्षापासून मी ह्या संस्थेचा सभासद आहे पण असा त्याचे सोबत जाण्याचा योग आलेला नव्हता !

वाटेत आमच्या गप्पा पण चालूच होत्या. संस्कार भारती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच एक अंग आहे पण संघाच्या इतर कार्याची आम्हास खरे तर फारशी ओळख नाही. आज आम्हाला त्यातील काहीची तोंड ओळख होत होती.
मावळातील हा मुळशी धरणा जवळचा  भाग डोंगर खोऱ्यांनी वेढलेला व निसर्गाने मुक्तहते उधळण केलेला प्रदेश आहे पण आत आतल्या गावातून  दळणवळणाचे बाबतीत मात्र  स्वातंत्रपूर्व काला इतकाच अप्रगत राहीलेला आहे, आणि शिक्षणाचे बाबतीत तर आजही तितकाच मागासलेला ! जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त चौथी पर्यंत आहेत म्हणजे आहेत ! आता संघाने एक शाळा काढली आहे ५ वी ते १० वी पावेतो, तेही सरकार कडून छदाम ही न घेता फक्त जमणाऱ्या देणगींवर.  त्यामुळे मुलांना तिथल्या तिथे शिकता तरी येते. निम्या मुलीही त्यात आहेत

काही वसतीगृहे ही चालवली जातात. अगदि स्वयंपूर्ण ! शिवाय महीलांचे विविध बचत गटही आहेत ! हा माणूस स्वत:चा ग्राफिकचा धंदा सांभाळून एव्हढी व्यवधाने कशी समर्थपणॆ सांभाळतो हे पाहणे कौतुकाचे आहे ! तेथिल निसर्ग सौंदर्याचे आधी काही फोटॊ दाखवतो.

दुधाचा धन्दा हा गावकऱ्यांचा पूरक धंदा.
आता आम्ही एक पठाराची जागा शोधलीय व बसतॊय ठिय्या मारून लँड्स्केपला.
ही बघा काही मी काढलेली जलरंग चित्रे !

हे पहिले लॅंडस्केप

हे दुसरे लॅंडस्केप

आणि हे तिसरे... मग परतलो

नाशिक-त्र्यंबकेश्वर,संस्कार भारती_ निवासी शिबीर

नाशिक –  त्र्यंबकेश्वर_ संस्कार भारती_ निवासी शिबीरखरे तर हे शिबीर गेल्या महिन्यात २४ ते २६ जानेवारी २०१०  ला पार पडले  व त्यासंबंधीचा पोस्ट खरे तर मी कधीच टाकायला हवा होता. परंतू  दिनांक २४ लाच माझ्या डिजीटल कॅमेऱ्यात अचानक बिघाड झाला , त्याचे शटरच चालू होत नव्हते! मला तर वाटले होते की त्या दिवशी चे घेतलेले शॉट्स बहुदा ’धारातीर्थी’ पडलेले असणार ! पण काल कॅमेरा दुरुस्त होऊन आला व त्या दिवशी घेतलेले शॉटस शाबूत होते , व म्हणूनच ही पोस्ट टाकू शकतोय !

हे शिबीर संस्कार भारतीच्या नेहमीच्या वर्गांना व कार्यक्रमाला जे येतात त्यांचे साठी असते ! दर शनिवारी दुपारी एका शाळेत आम्ही जमतो व व्यक्ती चित्रणाचा सराव करतो. तर दर रविवारी निसर्ग चित्रणासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच  ठरविलेल्या जागी जावून निसर्ग चित्रण करतो. माझे आता हे सहावे वर्ष आहे पण मला खाडा माहित नाही. अगदिच ठरविलेल्या जागी  जाता आले नाही तर वा जेथे असेन तेथे जवळच्या एखाद्या जागी जाऊन हजेरी लाऊन येतोच येतो !

यंदा आम्ही २३ ला दुपारी निघालॊ.२३, २४ व २५ ला त्र्यंबकेश्वरच्या ( शेगाव ) भक्ती निवासात राहीलो. व २६ ला सकाळी नाशिकच्या गंगाकांठी चित्रण करून दुपारी पुण्या कडॆ रवाना झालो. मात्र छायाचित्रे २४ चीच काही शाबूत राहीलीत ती येथॆ देत आहे. आमच्या बरोबर श्रीयुत संदीप यादव हे पुण्याचे प्रसिध्द तरुण चित्रकार तिन्ही दिवस होते. तर २५ तारखेला नाशिकचे तरुण चित्रकार श्रीयुत प्रफुल्ल सावंत होते.


२४ तारखेचॆ प्रात्यक्षिक  श्रीयुत संदीप यादव ह्यांनी दिले, त्याचे काही फोटो व व्हिडियो क्लिप्स मी घेऊ शकलो तेव्हढेच येथे देऊ शकत आहे. २५ तारखेचे पात्यक्षिक श्रीयुत प्रफुल्ल सावंत ह्यानी  त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ता वर दिले होते.
.
.

गजानन महाराज मठातील शिव मंदिर

ह्याच मंदिराचे लॅंडस्केप काढत आमच्या शंकांचे निरसन करीत ते पूर्ण केले
.
.
ह्याच मंदिराचे पेन ने मी काढलेले स्केच
.
आम्ही सारे प्रात्यक्षिक बघण्यात तल्लीन झालॊ होतो.
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात कएली आहे.
.
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात केली आहे. अधून मधून शंकांचे निरसन सुध्दा !
.
संस्कार भारतीचे नाशिक शिबीर २४ ते २६ जानेवारी २०१० श्री. संदीप यादव,प्रसिध्द जलरंग चित्रकार, व्हॅल्यू स्केच कसे काढायचे समजावत आहेत व जलरंगास सुरुवात केली आहे वॉश देऊन झाला आहे.
.

आणि निसर्ग चित्रण पूर्ण झाले

.

जर माझ्या कॅमेराने अवसान घातकी पणा केला नसता तर ?

.

.

पण ह्या जर….तर ला काही अर्थ नसतो ! जे पदरात पडले त्यावर समाधान मानून घ्यायलाच हवे नाही का ?

सविताचा वाढदिवस

कोण कुठली सविता ? त्याची ही एक गम्मतच आहे. आज आम्ही पुणे युनिव्हर्सिटीत निसर्ग चित्रे काढायला गेलो होतो. आज युनिव्हर्सिटी मध्ये पदवीदान समारंभ होता. अर्थातच त्यावेळी तेथे जत्रेचे स्वरूप असते. मुला-मुलींची पदवी पत्र मिळण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली असते. एरव्ही युनिव्हर्सिटीत बरीचशी सामसूम असते कारण तिचा विस्तार कित्येक एकर मध्ये पसरलेला आहे. पण आज जिकडेतिकडे गर्दी व रगांची उधळण झालेली दिसते !
मी आज जेथे रंगवायला बसलो होतो तेथिल हिरवळीवर पण एक मुला मुलींचा घोळका येऊन बसला. त्यातीलच एक सविता, तिचा आज नेमका वाढदिवस होता. घोळक्यातील सगळे तिचे अभिनंदन करीत होते. कोणीतरी तिच्यासाठी केक आणून कापला. तोपर्यंत मी अगदी कामात गढून गेलेला होतो. थोड्याच वेळात सविता स्वत: येऊन मला केक देऊ लागली. अर्थातच मी तिचे अभिनंदन करीत केक घेतला. मग मी तिला विचारले अगं मी तर तुला गिफ्ट तर दिलेच नाही ! माझ्याकडून गिफ्ट घेशील ना? क्षणभर तिने चमकून माझ्याकडे पाहिले…..हातात तर माझ्या काहीही नव्हते. मग मी म्हटले तू माझ्यापुढे फक्त दहा मिनिटेच बसायचे. ती तय्यार झाली.
मग मी तिचे पोर्ट्रेट पेन्सिलीने दहा मिनिटात तयार करून दिले तर सगळेच खुष झाले. सविता तर एकदमच खुष ! मलाही, मी ही गिफ्ट देऊ शकलॊ त्या मुळे आनंद झाला.

मग सगळ्यांनी मला मधे घेऊन हा फोटॊ काढला

अश्या रितीने सविताचा वाढदिवस साजरा झाला !

बिल्डींग मॉडेलींग

अपर्णाचा हट्ट आहे म्हणून हे सांगतोय. थोडे लांबलचक हॊणार आहे पण कंटाळू नका
खरं सांगायचं तर आयुष्य कशी वळणे घेईल हे कोणालाच सांगता येणार नाही. माझ्या मूळ आवडी आणि नंतर चे शिक्षण…नोकरी व्यवसाय ह्यांचा परस्परांशी तिळमात्र संबध नाही ड्राईंग हा विषय मला अगदी लहान पणा पासून गुंजवायचा. पण तो एकच विषय नाही सगळ्याच विषयात मी तितक्याच तन्मयतेने रमायचो  तसेच कुठलीही वस्तू मला कधीच टाकावू वाटली नाही…. मला वाटते त्या वयातील  सर्वांनाच ह्याची भूरळ पडत आसावी… पण मला जरा ज्यास्तच …कारण मधूनच माझ्या मोठ्या भावाला माझा खजिना तपासायची ( दुर्बुध्दी, असे मला तेव्हा वाटायचेच ) इच्छा झाली की आमचा खजिना पुरा साफ झालाच समजायचा!
त्यात मग काय नसायचे ? काडेपेट्या, बॉक्सेस, कांचा, सुतळ्या, दोरे, रंगीत चिंध्या, जुने तुटके, मोडके खेळ… आणि काय काय वाट्टेल ते…..तेव्हा पासून काडेपेट्यांची ..खोकींची गवतांची घरे झोपड्या करणे… त्यापुढे प्राणी मांडणे हे उद्योग चालायचाचे. शिवाय मला त्यावेळी एका भावाने ( आम्ही एकूण १४ भावंडे पैकी मी शिल्लक बघीतलीत ९, त्यातील सर्वात धाकटा.. मी शेंडेफळ अर्थात्च लाडाचा !) मेकॅनो आणून दिलेला होता, मग तर काय …
पण खरी गोडी व त्यातली कलात्मकता जाणवली शाळेत पाचवी ते सातवी मध्ये जेव्हा आम्हाला हस्तव्यवसाय शिकवायला रानडॆ नावाचे सर आले होते …. मागे मी त्यांच्या बाबत वर्णन केलेले आहेच.त्यांचे माझ्यावर प्रचंड प्रेम … त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्यात व करूनही घेतल्यात. त्यांनी तर मला एक गंमतीचा खेळ दिला होता. ..कार्ड शीट वर डाय कट केलेली प्रिंटेड  छोटी छोटी निरनिराळी घरे. झाडे, बसेस,अख्खी टाऊन्शिप ती मांडून मी त्यात तासन तास रमून जायचॊ …ती  फोल्ड करायची, एकमेकात अडकावयाची की झाली घरे तयार !. एकूण ती सर्व १७-१८ तरी असावीत. पुढे ती माझ्याकडून हरवली गेलीत कींवा कोणी तरी ती माझ्या नकळत मारलीत तरी!! मी तर घाबरून गेलो होतो की सर आता माझी चांगलीच हजेरी घेणार. मला हे फार जिव्हारी लागले व आपण त्यासारखे काही तरी बनवायचेच ह्या ईर्षेने मी ती घरे बनवलीत जी तुम्ही मागिल पोस्ट मधे बघीतली असतील. रानडे सरांना ही ती मी दाखवली, त्यांना मी त्यांचा तो खेळ हरवल्याचा राग येण्या ऐवजी ही घरे खूप आवडलीत व मला मिळाली शाबासकी … धपाट्या ऐवजी !
नंतर सुरवातीला सांगीतलेला  प्रमाणे माज्या शिक्षणा बाबत उहापोह होत मी पुण्यात सिव्हील इंजीनीअरींग डिप्लोमाला डेरेदाखल झालॊ. सिव्हीलच का तर माझा मोठा भाऊ सिव्हील मध्ये ग्रॅज्युएट झालेला होता व इथे नोकऱ्य़ा फटाफट मिळतात म्हणून… मलातर कशाचाच गंध नव्हता . तरी एकदाचा डिप्लोमा झालॊ व अपेक्षे प्रमाणे, तशी बऱ्या पगाराची नोकरीही लागली ह्या सर्व गोष्टीत टेक्नीकल ड्राईंग हा विषय मात्र आवडीचा निघाला.
पण मूळ स्वभाव, आवडीनिवडी मला थोड्याच गप्प बसू देतात ! एकदा एक कॉन्ट्रॅक्टर सुताराला घेऊन माझ्याकडे आला होता. त्याला एखादे कपाटाचे डिझाईन साठी हवे होते स्वत:साठी. मी माझ्या पध्दतीने काढून देऊन त्याला समजावले, अर्थात त्याला किती समजले असेल , मला शंकाच होती.
घरी आल्यावर त्यावर माझा विचार सुरू झाला व पहीले माऊंट बोर्ड मध्ये मॉडॆल तयार केलॆ. त्याचे उघडझाप करणारे दरवाजे थोडॆ डोके खाऊन गेले पण वरच्या बाजूने टांचण्या लावून तो प्रश्न सोडवला. हे मॉडेल त्याला खूप आवडले व पहील्याने त्याने त्याबद्दल  मला १५ रु दिले. ( त्या काळात  रु १५ कमी नव्हते , माझॆ अर्ध्या महीन्याचे खानावळीचे बील भागले होते. ) मला हा अर्थार्जनाचा नवा मार्ग सापडला होता.( माझे शिक्षण कर्जावर झाले. माझ्या खर्चाचा हिशेब वडिल स्वत: तपासत, एव्हढासाही वायफळ खर्च त्यांना खपत नसे. मग माझ्या आवडी-निवडी छंदाना कुठून पैसे मिळणार ? माझी पहीली विन्स्टन न्युटनची रंगाची पेटी  रु २५ ला घेतलेली मी आजही वापरतॊ…. अर्थात आता त्यातील रंग भारतीय आहेत…. कारण तश्याच नव्या पेटीची किंमत आज रु ५००० च्या पुढे आहे !)
तो कॉन्ट्रॅक्टर बाहेर बंगल्यांचीही कामे घेत असे. एकेदिवशी तो माझ्या कडॆ एका बंगल्याचे ड्राईंग घेऊन आला. एरव्ही मी त्याला मटेरीअल ची क्वांटीटी काढून देण्याचे काम जाता जाता करून देत असू. आज तो विचाराला आला होता व मी त्याचे मॉडेल करून द्यावे अशी त्याची इच्छा होती. मी त्याला थोड्याश्या मेहनतीने ते करून दिले त्याचे मला रु २५ दिले होते. पुढे मी त्याला मी बरीच मॉडेल्स करून दिलीत. तेव्हा मी माझा याशिका ६३५ हा पहीला वहीला कॅमेरा घेतला होता ( ज्याने मला लग्नांच्या फोटोच्या बऱ्याच ऑर्डर्स मिळवून दिल्यात.) . पुढे एका आर्किटेक्ट मित्रानेही अशी कामे मिळवून दिली होती.
सगळ्यांचेच फोटो काढलेले नाहीत पण काही फोटो पुढे देत आहे.

वरील फोटॊ व खालील फोटोतील वरचे दोन, हे एकाच  मॉडेल ची तीन रुपे आहेत, तर त्या खालचे चित्र त्याच बिल्डींगच्या प्रत्यक्ष बांधकामाचे आहे.

सर्वात शेवटचे ले आऊट मॉडेल आहे.

ही खालची चार ही चित्रे एकाच मॉडेलची आहेत. ही बिल्डींग पुणे येथे रास्ता पेठेत बांधली गेली. त्या वेळची पुण्यातील पहीली सात मजली बिल्डींग !

त्याचे मॉडेल करायचे मला सदभाग्य मिळाले !

खास तन्वी साठी !

हा ब्लॉग खास तन्वी साठी आहे. पण असे असले तरी माझे सर्व मित्र मंडळी ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात बरं का !
मी ही आठवण सांगत आहे त्यावेळी मी असेन बहुदा चवदा किंवा पंधरा वर्षांचा, माझ्या बगलेत आहे सर्वोदय माझा पुतण्या ( जन्म १९५६ ) तर मागे उभी स्वाती माझी पुतणी ( जन्म १९५२ ).
आता जो फोटो मी येथे पोस्ट केला आहे, ती ’ती’च गच्ची आहे जिथे तन्वी, मी तुझ्या आईलाही घेऊन येत असे ,,, काळही तोच असावा.( आई चा जन्म कधीचा ? ) फोटोत माझ्या पुढे जो ओटा आहे त्याचे बरोबर खाली कापसे कुटुंबीय म्हणजे तुझी आज्जी रहायची ( हा दुसरा मजला… म्हणजे मुंबईच्या भाषेत 1st floor ). गच्ची तून  खाली उतरायला एक जीना होता व पुढे दिड – दोन फुटाची गॅलरी / पॅसेज तिन्ही बाजूने जेथून खालील चौक ( २०’x२०’) दिसे व परत मोठ्या जिन्याने खाली चौकात येता येत असे. हा मागिल दारचा चौक, असाच पुढील दारी पण होता ! मधे मग पडवी , मधले घर, ओसरी असे, ज्या ओसरीत मोठा झोपाळा होता.
परत फोटो कडे वळतो. तॊ जरा निरखून पहा. तिथे छोटी छोटी मॉडेल्स केलेली आहेत. दोन वा तीन मजली घरे, बाल्कनी असलेली, रस्ता आहे, कॉर्नरचे गोल घर, आहे की नाही छोटी टाऊन्शिप ? तिथे एसटी बस पण आहे , सर्वात मागची लांब बिल्डींग आहे बहुदा सीबीएस ची…त्या पुढे मोटारी !…… गच्चीला मधेच मोठ्ठी थोरली गॅप पडलेली दिसते आहे का?….. ती आहे मधून जाणारी नदी !…. त्यावर एक छोटा पूल ही केलेला आहे बरं का , वर एक मोटार…..दिसतंय का सारे?…. त्यावेळी फोटोग्राफी इतकी adavance  नव्हती… साध्या बॉक्स कॅमेरावर काढलेला आहे हा फोटो.

हा फोटो आहे माझ्या आईचा, श्राध्दाचे लाडू वळतांनाचा…. येथे देण्यचे प्रयोजन ? हे आहे आमचे स्वैपाकघर. त्यावर कापसे कुटुंब राहायचे. डव्याबाजून अर्ध्या भागाचे वर जाळी होती व त्यापुढे होता चौक.

आता हा फोटॊ आहे रंगपंचमीचे दिवशीचा. रंग खेळून झालेला आहे. बजूला आहेत ती सर्व माझी भाचे मंडळी ! मी चौदावा ना…भाचे ही जवळपास माझ्याच वयाचे असणार.

येथे हा फोटो देण्याचा उद्देश… हा आहे चौक, मागे जाळी त्यामागे आमचे स्वैपाक घर व त्यावर रहायची, तन्वी तुझी आज्जी !

पुढे ह्या माझ्या छंदाने मला वेळेला थोडा पैसाही मिळवून दिला, त्याचे वर्णन पुन्हा कधीतरी करीन.

माझी बुक कव्हर्स

26/12/2009 9 comments
माझा एक मित्र आहे त्याचे वडिल कै. लक्ष्मण के. तांबे, त्यांच्या काळातील ते प्रख्यात हस्तसामुद्रिक. अत्यंत शांत धीर गंभीर स्वभाव. मित्राचे घरी गेलो व ते घरी असले तर सतत काहीतरी लिहीण्यात गढून गेलेले असत. ते पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेत ऑफीस सुपरींटेंडेंट होते.  त्यांनी ज्योतिषा वर अनेक पुस्तके लिहीलीत त्यांचे शेवटचे पुस्तक होते ’ साक्षात्कार’. शेवटचे म्हणतोय अश्या साठी , कारण नंतर पुढे ते फार जगले नाहीत. मी त्यावेळी जयपूर येथे होतो. ते काही दिवसांसाठी तिकडे येण्याच्या तयारीत होते, पण येऊ शकले नाहीत.
त्या काळात त्यांचे ’ साक्षात्कार’ चे लिखाण चालू होते. त्यात आत बरीच चित्रे काढायची होती. मी चित्रे काढतॊ म्हटल्यावर ते काम ओघानेच माझ्या कडॆ आले व आतील मी काढलेली खूपशी चित्रे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
पुस्तक जसे संपत आले, एके दिवशी मीच विषय काढला, ” नाना, पुस्तक तर तयार होत आले आहे,  कव्हरा साठी काही ठरवले आहे का? ” तेव्हा त्यांनी
प्रश्नार्थक दृष्टीने माझ्या कडे पाहीले. ” तुम्हाला चालणार असेल तर मी प्रयत्न करतो . “
झाले मी लगेच तयारीला लागलो. एक दोन नमुने दाखवले पण त्यांचे पसंतीस येईना. मी ही थोडा नर्व्हस झालॊ. तेच म्हणाले की काहीतरी नाविन्यपूर्ण कर कि शेल्फ वर आपले पुस्तक उठून दिसायला हवे ! एक दोन दिवस विचारात गेले. काही पुस्तकांची दुकाने ढुंढाळलीत. व मग एक विचार मनात चमकून गेला. मागे मी त्यांचे हाताच्या तळव्याचा ठसा घेतलेला होता.त्या पुस्तकातील स्केचेस साठीच, त्यावरून कल्पना सुचली व खालील कव्हर तयार झाले. हे क्व्हर नानांना एव्हढे आवडले की आधीच्या सर्व पुस्तकावर त्यांनी ते छापून घेतले. पुस्तकांची नावे फक्त आम्ही वेगवेगळी बनवून घेतलीत. हेच ते कव्हर !
हे दुसरे कव्हर ही असेच अचानक करायला मला सांगीतले गेले. तोही माझा जरा उशीरा झालेला मित्रच होता. ह्या आधीची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली होती व त्याची कव्हर्स बाहेरील आर्टीस्ट करून घेतली होती. ह्या नव्या पुस्तकाचे कव्हर मात्र त्याला माझ्याकडूनच हवे होते. हे ते दुसरे कव्हर !
खरं तर हा माझा विषय नव्हता त्यामुळे नंतर मात्र मी कधी त्या फंद्यात पडलॊ नाही. मात्र ही दोन कव्हर्स माझ्या खात्यात जमा होऊन गेलीत !!
प्रवर्ग: माझे छंद टॅगस्

मी काढलेली व्यंगचित्रे

23/12/2009 2 comments

मागिल पोस्ट मधे मी मॅगेझीन सेक्रेटरी म्हणून निवडलो गेलो या बाबतचे वर्णन दिले होते. ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती व ती आपण आता येथे बघुया. प्रत्यक्षात मी पाच चित्रे काढली होती पण प्रयत्न करूनही तूर्त मला तीनच मिळालीत.शेवटी विचार केला तीन तर तीन , तेरा वाजवू या नकॊ ! पुढे मागे मिळालीत तर ह्याच ब्लॉग मध्ये वाढवता येतील. ही सर्व व्यंगचित्रे ’आमचे व्यायाम प्रकार’ या विषयावर होती.

पहिले वर्ष सगळ्यांनाच कॉमन होते. आमच्यातील इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांचे हातात कायम मोठी मोठी पुस्तके असायची. त्यांचे इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी हा तर मोठ्ठा ठोकळाच होता म्हणून ते ’इलेक्ट्रीकल वेटलिफ्टींग” !

आम्ही तेव्हा डिप्लोमाला ऍडमीशन घेतली होती. आमच्या नविन इमारतीस सुरुवात झाली होती पण पुर्ण होण्यास अवकाश होता, तेव्हा आमचे वर्ग इंजिनियरींग कॉलेज मधेच पण दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत असत.  सुरवातीचे एक दोन व शेवटचे काही तास लेक्चर्स व मधल्या काळात प्रॅक्टीकल्स असत. दुपारी एक वाजता म्हणजे जेवून आलेले तर शेवटचे कंटाळा आलेले म्हणून मुले वर्गात चक्क झोपा काढीत असत ती ही ’ क्षणिक निद्रासने !’


आम्ही सिव्हिलचे विद्यार्थी सर्व्हेइंगला निघालॊ की सर्व सामान हातात वागवित व झेंडे वगैरे फडकावित जात असू , तॊ  हा आमचा ’मार्च-पास्ट !!’

अजून एक आठवते आहे ते म्हणजे जुवेलिअन थ्रो म्हणजे भाला फेक , आमची रेंजींग रॉड ची नेहमी फेकाफेकी असे त्याबाबत होते व ….पाचवे तर आठवतही नाहीये  !

माझे लेख !मी नुकताच पुण्यात शिकायला आलेला होतो. हे लेख , कविता वगैरे पासून तसा मी दूरच होतो. रामदास स्वामीची एक उक्ती आहे की दिवसामाजी काही तरी लिहावे ! कित्येक वेळी मी मनासी ठरवायचो एखादा आठवडा झाला की आळश्याची गाडी मूळ पदावर (… अशीच काही तरी म्हण का काय ते आहे ना? असो ) तेव्हा दोन चार कागद खरडले जायचेत ! आणि ते कुठे वाऱ्यावर उडायचे ते कळायचेही नाही ! मग पुढच्या वेळी वहीवर लिहायचे असे ठरवायचो. काही दिवस नेमाने तारीख घालायचो. ती वहीही कुठे गायब व्हायची…. असो. नंतर एक ६०० पानी नोटबुकच आणले होते त्यासाठी…. पण काय पुढली पाने कोरीच राहून गेलीत !

अशीच कधीतरी आम्हाला कसलीशी तब्बल एक महीन्याची सुट्टी होती. आता मनाचा हिय्या केला ! आणि खरंच तब्बल महीनाभर काही तरी लिहीत राहीलो… बापरे काय अफलातून विषय असायचे एकेक…. राजकारण (…जे कधीच कळले नाही ) तेही येऊन जायचे लेखांतून !….एकदा डोक्यात काही विषयच नव्हता आणि असाच जुनी आलेली पत्रे वाचित होतो. त्यात एक माझ्या भावाने मला लिहीलेलॆ पत्र होते व त्यात पत्र कसे लिहावे/असावे ह्याबाबत एक छानसा डॊस पाजला होता ! पत्राची भाषा कशी कलोक्वीअल असावी…जेणेकरून वाचणाऱ्याला आपण तेथेच आहोत असा भास व्हायला हवा …वगैरे वगैरे… !
ते पत्र मी दोनदा वाचले व माझे एकदम त्यावर विचारमंथन ( फार भारी शब्द वाटतोय ना ? ) सुरू झाले. नंतर मात्र  एक झक्कास लेख… जवळ जवळ एक टाकी लिहून तयार झाला. मी स्वत: तो एक दोनदा वाचला पण फारशी दुरूस्तीची गरज भासली नाही ! हा होता माझा पहिलावहिला लेख व त्याला कारणीभूत झाले, माझ्या भावाचे मला आलेले पत्र! तेव्हाच मी मनाशी ठरवले की हा कुठे तरी प्रसिध्दीला   पाठवायचं ! नंतर हा लेख माझ्या मित्र मंडळींनीही वाचला ! सगळ्यांनी मला दुजोरा दिला. आता हा छापायला कुठे पाठवायचा यावर बराच खल झाला व त्यावेळची प्रथितयश मासिके होती त्यातील एका कडे पाठवला. मात्र त्या मासिकात चक्क लिहीलेले होते की लेख परतीसाठी टपालहंशील पाठवू नये, नापसंत लेख आम्ही परत पाठवत नाहीत ( कारण टेबलाखाली कचरा कुंडी आहेच त्याचा आम्ही मुक्तपणॆ वापर करतो ! ) आणखीन एक दोन मासिकांनाही पाठवला व काही महीने गेले व मी लेख पाठवला होता हे विसरलो नव्हे विसरावेच लागले !

पुढेही कित्येक महिने गेले एक दिवस माझ्या मेव्हण्यांचे पत्र आले त्यात त्यांनी सहज कळवले की त्यांनी माझा एक लेख कुठल्याश्या मासिकात वाचलाय ! त्यांना नाव ही माहित नव्ह्ते मासिकाचे ! बरोबरच आहे ’हौस’ नावाचे मासिक नुकतेच निघालेले होते म्हणून त्यांनाही लेख पाठवला होता ! … मग मी त्या मासिकाच्या ऑफीस मध्ये गेलो तर नावाच्या बोर्डचा पता नाही व ऑफीस बंद ! दोन तिनदा चकरा मारल्या तरी ऑफीस बंदच ! सहजच चौकशी केली अन कपाळावर हातच मारला !

” अहो दोन महीने झाले , दोन तीन अंक निघाले व मासिकच बंद पडले ! काही राहीलेले अंकांचे गठ्ठे रद्दीत विकून मंडळी गायब आहेत !” बाजूच्या एकाने माहीती पुरवली !

पुढे काही दिवस मी बरीच रद्दीची दुकाने पालथी घातली तरी काही मिळेना . एके संध्याकाळी सोमवारी जुनी पुस्तके, मासिके मांडून बसलेली एक व्यक्ती पाहीली. तेथे ह्या हौस मासिकाचे एक दोन अंक होते ते मी विकत घेऊन चाळले पण माझा लेख काही त्यात नव्हता ! तोच म्हणाला  अजून असा अंक पलिकडल्या कडॆ पण आहे तो मी बघीतला आणि काय आश्चर्य त्यात माझा लेख चक्का छापून आलेला होता ! मी लगेच त्या मासिकाचे तिन्ही अंक रद्दीत विकत घेऊन टाकलेत !
मला माहीत आहे की तो लेख तुम्हालाही वाचायचा आहे…. मग वाचा तर.

खरे तर एव्हढ्यावर सारे काही संपणार होते. पण खुमखुमी होतीच ना ! मी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हा अशी ट्रॅडीशन होती की थर्ड इयर सिव्हील इंजीनियरींगचा नेहमी मॅगेझीन सेक्रेटरी असायचा. लगेच आमच्या मित्रमंडळीनी ठराव केला व मला निवडून आणले सुध्दा !
मग अर्थातच माझा त्यात लेख असायला हवाच !  चला तोही येथे देतो …वाचा.
ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती ती आपण बघुया पुढील पोस्ट मध्ये.
प्रवर्ग: माझे छंद टॅगस्

कर्दळ

आज गुरूवार म्हणजे पुण्याच्या विद्युत वितरण (अ) व्यवस्थापनाचा कत्तलचा  (म्हणजे विज पुरवठयाचा असणे नसणे या खेळाचा) दिवस ! त्यामुळे जवळपासचे छोटे मोठे कारखानदारांचा आज सुटीचा दिवस असतो. माझे एक स्नेही आहेत. जवळच आंबेगावला त्यांचा वर्कशॉप आहे. बुधवारीच त्यांचा मला हमखास फोन येतो उद्या कुठे जायचे त्यासाठी ! मग त्यांचे गाडीतून लॅंडस्केप साठी आम्ही कुठे कुठे जात असतो.
एकदा त्यांना वर्कशॉप मध्येच काम होते. विज नसली तरी डिलिव्हरी देणे वगैरे काम होण्या सारखे होते. त्यांनी सहज विचारले, वर्कशॉप वर येणार का? पण बघा बुवा तिथे काही स्पॉट मिळेल का बघावे लागेल. मी काय एका पायावर ( त्याचीही गरज नव्हती कारण कार मधूनच जायचे होते.) तय्यार. हे पहा त्या वेळी काढलेले चित्र.
आज मी स्कुटरने त्यांचे घरी गेलो स्कुटर त्यांचे बंगल्यात लावली तेव्हाच बाहेरच्या कर्दळीने माझे लक्ष वेधले होते पण आज आम्ही पाषाणला जायला निघालो होतो.
का कोण जाणे माझे पहिलेच चित्र बिघडले आणि मग मूडच येईना. नंतर एक ब्रश-स्केच व एक पोर्ट्रेट ही  काढले पण तरीही मूड काही आलाच नाही. आज घरी लवकर या अशी त्यांना तंबी असल्याने सारे लक्ष घड्याळाकडॆ लागलेले. मग काम संपवित दोघेही घरी परतलो.
त्यांचे बंगल्यात पाऊल टाकले मात्र, त्या कर्दळीने परत माझे लक्ष खेचलेच ! मग मात्र तिथेच ठिय्या मारीत झटपट कर्दळीला माझ्या कागदावर थबकवले !!


माझी मूर्तिकला

माझ्या मूर्तिकलेला कधी बरे सुरूवात झाली असावी ? मी सहजच आठवत बसलो होतो, पण स्पष्ट पणे काही लक्षात येत नव्हते. पण एके दिवशी मनातल्या मनात एक ललकारी ऐकू येऊ लागली. ” होळी होळीला पांच पांच गवऱ्या ! ” आणि मी एकदम माझ्या लहाणपणात अवतरलो !

असेन बहुदा मी तीन ते पाच वर्षांचा. शाळेत जायला लागलो नव्हतो. मला पक्के आठवते की सहावे लागले आणि मला एकदम दुसरीत घातले होते ! वरील नारे करीत गल्लीतील मुले होळी साठी गवऱ्या, लाकडे जमा करीत असत कींवा पळवापळवी ही करीत. आमची होळी दादा ( म्हणजे माझे वडील) सकाळी पुढील चौकात सोवळे नेसून करीत असत. नैवेद्याला हमखास पुरणाची पोळी असायचीच. हॊळीची तयारी अर्थातच मलाच करावी लागे. विशेष फुलाचा पुडा उघडून तबकात वेगवेगळी करणे, गंध उगाळून ठेवणे, होळीचे साहित्य जुळवणे इ.इ. अजून एक विशेष गोष्ट माझ्यावर सोपवलेली असे ती म्हणजे गुळा चे प्राणी म्हणजे साप,विंचू,इतर किटके आदि करून ठेवणे ! ज्यांचा नंतर होळीच्या ज्वालात स्वाहाकार होत असे ! माझ्यातल्या मूर्तिकाराचे बीज तेव्हाच अंकुरले असावे, कारण मी बनविलेल्या विंचवाला बघून ” हं लक्ष दे चावेल ” असे एकदा मला दादा म्हणाल्याचे स्मरते ! मी खूप मनलावून ते प्राणी बनवायचो, कारण पुढे वर्षभर असे प्राणी आपल्याकडे फिरकत नाहीत अशी आमची समजूत करून दिलेली असायची. अर्थात उरलेला गूळ गट्टम करायला मिळायचा हा फायदा असायचाच ! त्याची तजविज गूळ घेतानाच घेतली जायची ! आत्ता मला जाणवते की बहुदा माझ्यातल्या नव्याने अंकुरणाऱ्या मूर्तिकलेला ती दाद /शाबासकीच असावी.

पुढे पाचवीत आम्हाला हस्तव्यवसायासाठी वेगळ्या शिक्षकाची नेमणूक व वेगळा तास मिळू लागला. पेठे विद्यालयात त्यावेळी रानडे आडनावाचे शिक्षक होते व ते शाळेच्या अगदि जवळ रहात . शिवाय आमची त्यांचेशी घरगुती ओळख असल्याने मी त्यांचे कडे नेहमी जात असे कारण मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. दर गॅदरींगला ते माझ्याकडून काहीतरी वेगळे बनवून घ्यायचे. एका वर्षी आम्ही धरणाची प्रतिकृती केली होती. त्यासाठी धरणाचे पोटात बोहोरी आळीतील गांगल टिनमेकर कडून टिन चा ट्रफ बनवून घेतला होता व त्यात खरे खुरे पाणी साठवून धरणातून पडते असे ते दृश्य केले होते. सरांनी त्याला भरपूर मदत क्र्ली होतीच. पण ट्रफ ची कल्पना माझी होती म्हणून सरांनी माझी पाठ थोपटली होती. शिवाय कागदाचा लगदा करून त्याच्याही काही काही वस्तू बनवल्या होत्या. तेव्हा जे केले ते शेवटचे पुन्हा त्या वाटेला जाईल अशी मला स्वत:लाही सुतराम शक्यता वाटली नव्हती.

पण पुढे त्याचे असे झाले मी डीप्लोमाला गणितासाठी नारायणपेठे तील देशपांडे सरांचा क्लास लावला होता. क्लासला मागिलबाजूने जिन्याने जावे लागे, त्याच्या पलिकडील वाडा मूर्तिकार गोखल्यांचा होता व जातायेता ते गणपती करतांना दिसायचे. एकेदिवशी हिय्या करून गेलो व मला शिकवाल का असे विचारले. त्यावेळी रंगकाम सुरू होते, आधी हे रंगकाम शिकायला या व नंतर पुढील वर्षी मातीकाम शिका असा सल्ला दिला व त्यानुसार आमच्र रंग काम सुरू झाले. एखादे वेळी एखाद्या गणपतीचे काम करीत असतांनाही ते दिसत असत तेव्हढेच ! पुढे क्लास सुटला व आमचे तेथे जाणेही बंद झाले !

असेच कुठलेसे एक मूर्तिचे प्रदर्शन पाहून आलॊ व मनात त्याचेच विचार घुटमळत होते त्याच तिरीमिरीत बाजारातून शाडू मातीचे पोतेच घेऊन आलो. (आजही घरात पडून आहे ! कधी मूड यॆईल सांगता थोडेच येणार ) नंतर ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीतून संबधित पुस्तके आणली व माझा मीच अभ्यास सुरू केला. त्यावेळी बऱ्याच लहान मोठ्या मूर्ती घडत गेल्या. व व्यक्त व्हायचा अजून एक मार्ग मला सांपडला !

सोबत मी केलेल्या काही मूर्तींचे फोटॊ देत आहे.

ही तरूणी हातात पुजेचे साहित्य घेऊन निघाली आहे.  हा  statue  जे जे स्कूल ऑफ आर्टच्या दर्शनी प्रवेश दालनात आहे. मला त्याचा एक फोटॊ मिळाला होता त्यावरून केला.

वरील चारही फोटोज मी केलेल्या एकाच मूर्तीचे निरनिराळ्या कोनातील आहेत

वरील दोन्ही मूर्ती आता राहील्या नाहीत ! राहील्यात त्या आठवणी व फोटो.

वरील गणपती व हरताळिकांच्या मूर्ती ह्या आम्ही सध्याच्या सोसायटीत रहायला आल्या नंतर च्या वर्षी म्हणजे १९८६ च्या सुमारास बनवल्या होत्या. अख्ख्या सोसायटीतील महिलांनी त्या पुजिल्या होत्या, नंतर अर्थात त्यांचे विसर्जन केले. माझ्या कडॆ राहील्या त्या आठवणी व हे फोटो.