मुखपृष्ठ > अवांतर > मेमरी स्लॉट

मेमरी स्लॉट

मला अचानक मोबाईल वर फोन आला. मी नंबर आठवतोय पण मला काही आठवेना. कोणाचा असेल बरं हा फोन? मी विचारात पडलो , म्हटलं बघुया तरी कोण आहे ते…. आतून आवाज आला, ” तू सुरेश का ? पेठे ना ? ” …म्हटलं ” बोलतोय ! “. परत फोन माझ्याशी बोलू लागला… ” अरे मी अशोक शहा….तुला पंचावन साठ वर्षे तरी मागे जायला लागेल ! मी नाशिकहून बोलतोय “… मला जाम काही म्हणता काही आठवेना.
मग त्याने एकेक खाणाखुणा सांगायला सुरूवात केली. आम्ही बरोबर ५ वीत पॆठे हायस्कुल ला होतो. पेठे हायस्कुल कडून मेन रोड ला जायला एक पायऱ्यांचा बोळ होता. शाळा सुटली की आम्ही त्या पायऱ्यांवरून सुसाट पळत मेन रोड पर्यंत धावत यायचो.
तो माझ्याकडे खेळायला यायचा. चौकातून ओसरीवर आलो की मोठ्ठा झोपाळा होता. माझ्याकडॆ मला तेव्हा भावाने भेट दिलेला मेकॅनो होता , तासनतास आम्ही त्याचेशी खेळायचो.
तो एकेक गोष्टी मला खडान खडा सांगत सुटला अन माझी काही ट्युब पेटेना. माझ्या त्याच्या मित्रांची झाडून माहिती सांगीतली अन मग माझी एकदम ट्युब पेटली ! मलाही मग एकेक गोष्टी आठवू लागल्या. फोन वर जवळ जवळ पाऊण तास तरी बोललो असू. खरंच त्याने मला पंचावन साठ सालातील नाशिक फिरवून आणले.
त्यात काय काय नव्हते ! सरकारवाडा, सोन्या मारूती, ज्याचे दर्शन मी कधी चुकवित नसे, यशवंत व्यायाम शाळा त्याचे समॊरील आजही असलेला सायकल दुकान वाला, ज्याचे कडून सायकली भाड्याने घेऊन समोरील व्यायाम शाळेच्या ग्राऊंड वर शिकायला जायचो. मेन रोड वरील ऒळीने एकेक दुकाने, त्यात बारदान चे दुकान असो नाहीतर भगवंतरावाचे हॉटेल असो. कारंजावरील खुरचंद वड्यांचे दुकान असो. जी.के चे पुस्तकाचे दुकान, ठाकुराचे खेळण्याचे दुकान, चिवड्यांची दुकाने, पांडेचे पेढे….काय काय सारं कसं स्वच्छ दिसायला व आठवायला लागलं.
तन्वी शी ओळख झाली आणि नाशिकचे एकुण एक माझ्यापुढे ह्या नाही तर त्या स्वरूपात समोर येऊ लागले
ह्या गोष्टीला योगायोग म्हणावे …की काय म्हणावे.. मलाच समजेनासे झाले आहे. अर्थात कितीही वर्षे झालेली असोत आपल्या प्रत्येका कडॆ एक मेमरी स्लॉट असतो व असे काही झाले की तो उफाळून येतोच येतो.
प्रवर्ग: अवांतर टॅगस्,
  1. sahajach
    06/01/2010 येथे 2:31 pm

    काका मला वाटतयं तुम्ही, मी आणि आजी गप्पा मारायला बसल्यावर आपण जुन्या नव्या नाशकाची मोठ्ठी सफर करणार आहोत…..भगवंतरावाचे दुकान, जी.के पुस्तकालय असो की त्यासमोरची लोकरीचे सुंदर कपडे ठेवणारी दुकानं असोत, बोहोर पट्टी असो की पगडबंद लेन आजी आणि मी तासनतास गप्पा मारतो……

    खरयं तुमचं…..आपल्या प्रत्येका कडॆ एक मेमरी स्लॉट असतो व असे काही झाले की तो उफाळून येतोच येतो……आणि मग आपण आपल्यातच आपल्या आठवणींसहित अजुन अजुन रमतो!!!!!

  2. 12/01/2010 येथे 11:52 सकाळी

    तुमचा ब्लॉग फलक माझ्या ब्लॉग वर लावला आहे.

  3. 12/01/2010 येथे 11:55 सकाळी

    महेंद्रजी ,
    त्याबद्दल आभार

  1. No trackbacks yet.

Leave a reply to sahajach उत्तर रद्द करा.