बिल्डींग मॉडेलींग
अपर्णाचा हट्ट आहे म्हणून हे सांगतोय. थोडे लांबलचक हॊणार आहे पण कंटाळू नका
खरं सांगायचं तर आयुष्य कशी वळणे घेईल हे कोणालाच सांगता येणार नाही. माझ्या मूळ आवडी आणि नंतर चे शिक्षण…नोकरी व्यवसाय ह्यांचा परस्परांशी तिळमात्र संबध नाही ड्राईंग हा विषय मला अगदी लहान पणा पासून गुंजवायचा. पण तो एकच विषय नाही सगळ्याच विषयात मी तितक्याच तन्मयतेने रमायचो तसेच कुठलीही वस्तू मला कधीच टाकावू वाटली नाही…. मला वाटते त्या वयातील सर्वांनाच ह्याची भूरळ पडत आसावी… पण मला जरा ज्यास्तच …कारण मधूनच माझ्या मोठ्या भावाला माझा खजिना तपासायची ( दुर्बुध्दी, असे मला तेव्हा वाटायचेच ) इच्छा झाली की आमचा खजिना पुरा साफ झालाच समजायचा!
त्यात मग काय नसायचे ? काडेपेट्या, बॉक्सेस, कांचा, सुतळ्या, दोरे, रंगीत चिंध्या, जुने तुटके, मोडके खेळ… आणि काय काय वाट्टेल ते…..तेव्हा पासून काडेपेट्यांची ..खोकींची गवतांची घरे झोपड्या करणे… त्यापुढे प्राणी मांडणे हे उद्योग चालायचाचे. शिवाय मला त्यावेळी एका भावाने ( आम्ही एकूण १४ भावंडे पैकी मी शिल्लक बघीतलीत ९, त्यातील सर्वात धाकटा.. मी शेंडेफळ अर्थात्च लाडाचा !) मेकॅनो आणून दिलेला होता, मग तर काय …
पण खरी गोडी व त्यातली कलात्मकता जाणवली शाळेत पाचवी ते सातवी मध्ये जेव्हा आम्हाला हस्तव्यवसाय शिकवायला रानडॆ नावाचे सर आले होते …. मागे मी त्यांच्या बाबत वर्णन केलेले आहेच.त्यांचे माझ्यावर प्रचंड प्रेम … त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्यात व करूनही घेतल्यात. त्यांनी तर मला एक गंमतीचा खेळ दिला होता. ..कार्ड शीट वर डाय कट केलेली प्रिंटेड छोटी छोटी निरनिराळी घरे. झाडे, बसेस,अख्खी टाऊन्शिप ती मांडून मी त्यात तासन तास रमून जायचॊ …ती फोल्ड करायची, एकमेकात अडकावयाची की झाली घरे तयार !. एकूण ती सर्व १७-१८ तरी असावीत. पुढे ती माझ्याकडून हरवली गेलीत कींवा कोणी तरी ती माझ्या नकळत मारलीत तरी!! मी तर घाबरून गेलो होतो की सर आता माझी चांगलीच हजेरी घेणार. मला हे फार जिव्हारी लागले व आपण त्यासारखे काही तरी बनवायचेच ह्या ईर्षेने मी ती घरे बनवलीत जी तुम्ही मागिल पोस्ट मधे बघीतली असतील. रानडे सरांना ही ती मी दाखवली, त्यांना मी त्यांचा तो खेळ हरवल्याचा राग येण्या ऐवजी ही घरे खूप आवडलीत व मला मिळाली शाबासकी … धपाट्या ऐवजी !
नंतर सुरवातीला सांगीतलेला प्रमाणे माज्या शिक्षणा बाबत उहापोह होत मी पुण्यात सिव्हील इंजीनीअरींग डिप्लोमाला डेरेदाखल झालॊ. सिव्हीलच का तर माझा मोठा भाऊ सिव्हील मध्ये ग्रॅज्युएट झालेला होता व इथे नोकऱ्य़ा फटाफट मिळतात म्हणून… मलातर कशाचाच गंध नव्हता . तरी एकदाचा डिप्लोमा झालॊ व अपेक्षे प्रमाणे, तशी बऱ्या पगाराची नोकरीही लागली ह्या सर्व गोष्टीत टेक्नीकल ड्राईंग हा विषय मात्र आवडीचा निघाला.
पण मूळ स्वभाव, आवडीनिवडी मला थोड्याच गप्प बसू देतात ! एकदा एक कॉन्ट्रॅक्टर सुताराला घेऊन माझ्याकडे आला होता. त्याला एखादे कपाटाचे डिझाईन साठी हवे होते स्वत:साठी. मी माझ्या पध्दतीने काढून देऊन त्याला समजावले, अर्थात त्याला किती समजले असेल , मला शंकाच होती.
घरी आल्यावर त्यावर माझा विचार सुरू झाला व पहीले माऊंट बोर्ड मध्ये मॉडॆल तयार केलॆ. त्याचे उघडझाप करणारे दरवाजे थोडॆ डोके खाऊन गेले पण वरच्या बाजूने टांचण्या लावून तो प्रश्न सोडवला. हे मॉडेल त्याला खूप आवडले व पहील्याने त्याने त्याबद्दल मला १५ रु दिले. ( त्या काळात रु १५ कमी नव्हते , माझॆ अर्ध्या महीन्याचे खानावळीचे बील भागले होते. ) मला हा अर्थार्जनाचा नवा मार्ग सापडला होता.( माझे शिक्षण कर्जावर झाले. माझ्या खर्चाचा हिशेब वडिल स्वत: तपासत, एव्हढासाही वायफळ खर्च त्यांना खपत नसे. मग माझ्या आवडी-निवडी छंदाना कुठून पैसे मिळणार ? माझी पहीली विन्स्टन न्युटनची रंगाची पेटी रु २५ ला घेतलेली मी आजही वापरतॊ…. अर्थात आता त्यातील रंग भारतीय आहेत…. कारण तश्याच नव्या पेटीची किंमत आज रु ५००० च्या पुढे आहे !)
तो कॉन्ट्रॅक्टर बाहेर बंगल्यांचीही कामे घेत असे. एकेदिवशी तो माझ्या कडॆ एका बंगल्याचे ड्राईंग घेऊन आला. एरव्ही मी त्याला मटेरीअल ची क्वांटीटी काढून देण्याचे काम जाता जाता करून देत असू. आज तो विचाराला आला होता व मी त्याचे मॉडेल करून द्यावे अशी त्याची इच्छा होती. मी त्याला थोड्याश्या मेहनतीने ते करून दिले त्याचे मला रु २५ दिले होते. पुढे मी त्याला मी बरीच मॉडेल्स करून दिलीत. तेव्हा मी माझा याशिका ६३५ हा पहीला वहीला कॅमेरा घेतला होता ( ज्याने मला लग्नांच्या फोटोच्या बऱ्याच ऑर्डर्स मिळवून दिल्यात.) . पुढे एका आर्किटेक्ट मित्रानेही अशी कामे मिळवून दिली होती.
सगळ्यांचेच फोटो काढलेले नाहीत पण काही फोटो पुढे देत आहे.
वरील फोटॊ व खालील फोटोतील वरचे दोन, हे एकाच मॉडेल ची तीन रुपे आहेत, तर त्या खालचे चित्र त्याच बिल्डींगच्या प्रत्यक्ष बांधकामाचे आहे.
सर्वात शेवटचे ले आऊट मॉडेल आहे.
ही खालची चार ही चित्रे एकाच मॉडेलची आहेत. ही बिल्डींग पुणे येथे रास्ता पेठेत बांधली गेली. त्या वेळची पुण्यातील पहीली सात मजली बिल्डींग !
त्याचे मॉडेल करायचे मला सदभाग्य मिळाले !
प्रवर्ग: माझे छंद
बिल्डींग-मॉडेलींग
सुंदर आहेत मॉडॆल्स सगळे..
Nice Models.
महेंद्रजी,
ऑन लाईन्स आहात काय ? अजून हात सुध्दा धुतले नव्ह्ते ब्लॉग टाकून ! इतक्यात प्रतिक्रिया पोचली सुध्दा !
…
आभारी आहे.
काका, मी पण सिवील इंजिनीअरच बर का!!! मॉडेल मस्त आहेत!! आता मॉडेल बनवन पूर्वीहून सोप्प झालय.आमच्या कंपनीत ३डी प्रिंटर आहे. मॉडेल रेडी होत फक्त ते असेंब्ल करून फिनीशिंग करायच.
होय ना, मनमौजी, पुर्वी तर साधे कटर ही नसायचे. मॉडेल पूर्ण झाले की ब्लेडमुळे बोटांना झालेली जखम बरी व्हायला दोन तीन दिवस जायचे.
हा माझा छंद होता. आम्हाला कोणी शिकवले नव्हते कोर्स मध्ये.
अभिप्रायाबद्दल आभार.
काका मस्तच आहेत मॉडेल्स…..माझे सर (बॉस) मला नेहेमी म्हणायचे की
Perfection is not a quality it is a habit..
मला नेहेमी पटते ते….
एखाद्या माणसाला कुठलेही काम द्या तो ते सगळया बारकाव्य़ांसहित काटेकोरपणे केवळ उत्तमच करून दाखवेल….तुम्ही तसेच आहात!!!!
(या लेखातला काहि मजकुर दोन वेळा आलेला आहे तो तेव्हढा एडीट करा….)
तन्वी ,
आभारी आहे.
आता नीट केले आहे . बघून जरा परत सांग. असे का होतेय ?
काका अगदी बरोबर आहे त्या काळात अगदी अपुर्या साधनांशिवाय अशे मॉडेल्स करण अन् ते ही कोणाच्या मार्गदर्शना शिवायम्हणजे कठीण काम !!! खरच खूप ग्रेट आहात तुम्ही!!
सुंदर मॉडॆल्स
अजय,
आभारी आहे.
छान आहेत मोडेल्स काका !
सौरभ
अभिप्रायाबद्दल आभार
पेठेकाका, माझे हट्ट इतक्या लगेच आजकाल नवराही पुरे करत नाही अर्थात आमचं पोरगं टॉपलिस्टवर आहे म्हणा…पण चला, माझे काका माझे हट्ट पुरवतात हे जास्त छान आहे…
ही पोस्ट वाचताना मला लक्षात आलं की आपण दोघंही एका समान धाग्याने जोडलो गेलो आहोत आणि तो म्हणजे मीही तुमच्यासारखंच शेंडेफ़ळ आहे…मला वाटतं शेंडेफ़ळांना कायम लहान असण्याचा हक्कच आहे नाही का??
चला आता पोस्टबद्दल पण 🙂
मला मॉडेल्स आणि त्याची गोष्ट सारंच आवडलं….कधी कधी परिस्थितीमुळे काही छंद हाताशी लागतात त्याचं उत्तम उदा. आणि मुख्य म्हणजे त्यामुळे त्यावेळी आर्थिक हातभार लागला..सगळंच कौतुकास्पद…आताही मॉडेल्स बनवता का तुम्ही???
अपर्णा,
हट्ट करायला आणि पुरवणाराही असेल तर छान वाटतंय ना? तू म्हणत्येस तसे शेंडेफळांचा तो हक्कच आहे. हट्ट पुरवण्यातही एक प्रकारचा आनंदच मिळतो ( आता नवऱ्याकडे तू काय काय हट्ट धरतेस मला काय माहीत!).
…
आता अशी मागणी राहीलेली नाही. आता कॉम्प्युटर वर सर्व काही करता येते अगदी बेडरूम ..बाथरूम पर्यंत घरभर फिरता येते, मग ह्या मॉडेल्सची काय गरज?… तसं मनात आणलं तर अजूनही करू शकेन मी !
अभिप्रायाबद्दल संतॊष !
सुंदर मॉडेल बनविली आहेत आपण.
अभिप्रायाबद्दल संतॊष !
नमस्कार
मी जवळ जवळ सगळे ब्लॊग वाचले. तुमचि स्मरण्शक्ति पण चान्गलि आहे.सगळ्या आठवणी वाचल्या कि आपले पण जुने दिवस आठवतात.
आचुन छान वाटले. असेच लिहित रहा.
तुमच्याच अभिप्रायाची आतुरतेने वाट पहात होतो. ह्या आधी कविता, चित्रे आदीतून मी व्यक्त होत होतोच पण हे माध्यम मला सर्वात जास्त आवडले. तसे ही रोज एक चित्र चा संकल्प उद्याच संपत आहे, त्यामुळेही हे माध्यंम आता मी जवळ करीत आहे. ह्या माझ्या ब्लॉग चे नावच ” येss रे मना येरे ss मना “, आहे व त्यात माझ्या मनाचीच दादागिरी चालणार आहे !!… मग काय विषयाला नो आडकाठी !