Archive

Archive for 21/12/2009

माझे लेख !मी नुकताच पुण्यात शिकायला आलेला होतो. हे लेख , कविता वगैरे पासून तसा मी दूरच होतो. रामदास स्वामीची एक उक्ती आहे की दिवसामाजी काही तरी लिहावे ! कित्येक वेळी मी मनासी ठरवायचो एखादा आठवडा झाला की आळश्याची गाडी मूळ पदावर (… अशीच काही तरी म्हण का काय ते आहे ना? असो ) तेव्हा दोन चार कागद खरडले जायचेत ! आणि ते कुठे वाऱ्यावर उडायचे ते कळायचेही नाही ! मग पुढच्या वेळी वहीवर लिहायचे असे ठरवायचो. काही दिवस नेमाने तारीख घालायचो. ती वहीही कुठे गायब व्हायची…. असो. नंतर एक ६०० पानी नोटबुकच आणले होते त्यासाठी…. पण काय पुढली पाने कोरीच राहून गेलीत !

अशीच कधीतरी आम्हाला कसलीशी तब्बल एक महीन्याची सुट्टी होती. आता मनाचा हिय्या केला ! आणि खरंच तब्बल महीनाभर काही तरी लिहीत राहीलो… बापरे काय अफलातून विषय असायचे एकेक…. राजकारण (…जे कधीच कळले नाही ) तेही येऊन जायचे लेखांतून !….एकदा डोक्यात काही विषयच नव्हता आणि असाच जुनी आलेली पत्रे वाचित होतो. त्यात एक माझ्या भावाने मला लिहीलेलॆ पत्र होते व त्यात पत्र कसे लिहावे/असावे ह्याबाबत एक छानसा डॊस पाजला होता ! पत्राची भाषा कशी कलोक्वीअल असावी…जेणेकरून वाचणाऱ्याला आपण तेथेच आहोत असा भास व्हायला हवा …वगैरे वगैरे… !
ते पत्र मी दोनदा वाचले व माझे एकदम त्यावर विचारमंथन ( फार भारी शब्द वाटतोय ना ? ) सुरू झाले. नंतर मात्र  एक झक्कास लेख… जवळ जवळ एक टाकी लिहून तयार झाला. मी स्वत: तो एक दोनदा वाचला पण फारशी दुरूस्तीची गरज भासली नाही ! हा होता माझा पहिलावहिला लेख व त्याला कारणीभूत झाले, माझ्या भावाचे मला आलेले पत्र! तेव्हाच मी मनाशी ठरवले की हा कुठे तरी प्रसिध्दीला   पाठवायचं ! नंतर हा लेख माझ्या मित्र मंडळींनीही वाचला ! सगळ्यांनी मला दुजोरा दिला. आता हा छापायला कुठे पाठवायचा यावर बराच खल झाला व त्यावेळची प्रथितयश मासिके होती त्यातील एका कडे पाठवला. मात्र त्या मासिकात चक्क लिहीलेले होते की लेख परतीसाठी टपालहंशील पाठवू नये, नापसंत लेख आम्ही परत पाठवत नाहीत ( कारण टेबलाखाली कचरा कुंडी आहेच त्याचा आम्ही मुक्तपणॆ वापर करतो ! ) आणखीन एक दोन मासिकांनाही पाठवला व काही महीने गेले व मी लेख पाठवला होता हे विसरलो नव्हे विसरावेच लागले !

पुढेही कित्येक महिने गेले एक दिवस माझ्या मेव्हण्यांचे पत्र आले त्यात त्यांनी सहज कळवले की त्यांनी माझा एक लेख कुठल्याश्या मासिकात वाचलाय ! त्यांना नाव ही माहित नव्ह्ते मासिकाचे ! बरोबरच आहे ’हौस’ नावाचे मासिक नुकतेच निघालेले होते म्हणून त्यांनाही लेख पाठवला होता ! … मग मी त्या मासिकाच्या ऑफीस मध्ये गेलो तर नावाच्या बोर्डचा पता नाही व ऑफीस बंद ! दोन तिनदा चकरा मारल्या तरी ऑफीस बंदच ! सहजच चौकशी केली अन कपाळावर हातच मारला !

” अहो दोन महीने झाले , दोन तीन अंक निघाले व मासिकच बंद पडले ! काही राहीलेले अंकांचे गठ्ठे रद्दीत विकून मंडळी गायब आहेत !” बाजूच्या एकाने माहीती पुरवली !

पुढे काही दिवस मी बरीच रद्दीची दुकाने पालथी घातली तरी काही मिळेना . एके संध्याकाळी सोमवारी जुनी पुस्तके, मासिके मांडून बसलेली एक व्यक्ती पाहीली. तेथे ह्या हौस मासिकाचे एक दोन अंक होते ते मी विकत घेऊन चाळले पण माझा लेख काही त्यात नव्हता ! तोच म्हणाला  अजून असा अंक पलिकडल्या कडॆ पण आहे तो मी बघीतला आणि काय आश्चर्य त्यात माझा लेख चक्का छापून आलेला होता ! मी लगेच त्या मासिकाचे तिन्ही अंक रद्दीत विकत घेऊन टाकलेत !
मला माहीत आहे की तो लेख तुम्हालाही वाचायचा आहे…. मग वाचा तर.

खरे तर एव्हढ्यावर सारे काही संपणार होते. पण खुमखुमी होतीच ना ! मी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हा अशी ट्रॅडीशन होती की थर्ड इयर सिव्हील इंजीनियरींगचा नेहमी मॅगेझीन सेक्रेटरी असायचा. लगेच आमच्या मित्रमंडळीनी ठराव केला व मला निवडून आणले सुध्दा !
मग अर्थातच माझा त्यात लेख असायला हवाच !  चला तोही येथे देतो …वाचा.
ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती ती आपण बघुया पुढील पोस्ट मध्ये.
प्रवर्ग: माझे छंद टॅगस्