Archive

Archive for 17/12/2009

कर्दळ

आज गुरूवार म्हणजे पुण्याच्या विद्युत वितरण (अ) व्यवस्थापनाचा कत्तलचा  (म्हणजे विज पुरवठयाचा असणे नसणे या खेळाचा) दिवस ! त्यामुळे जवळपासचे छोटे मोठे कारखानदारांचा आज सुटीचा दिवस असतो. माझे एक स्नेही आहेत. जवळच आंबेगावला त्यांचा वर्कशॉप आहे. बुधवारीच त्यांचा मला हमखास फोन येतो उद्या कुठे जायचे त्यासाठी ! मग त्यांचे गाडीतून लॅंडस्केप साठी आम्ही कुठे कुठे जात असतो.
एकदा त्यांना वर्कशॉप मध्येच काम होते. विज नसली तरी डिलिव्हरी देणे वगैरे काम होण्या सारखे होते. त्यांनी सहज विचारले, वर्कशॉप वर येणार का? पण बघा बुवा तिथे काही स्पॉट मिळेल का बघावे लागेल. मी काय एका पायावर ( त्याचीही गरज नव्हती कारण कार मधूनच जायचे होते.) तय्यार. हे पहा त्या वेळी काढलेले चित्र.
आज मी स्कुटरने त्यांचे घरी गेलो स्कुटर त्यांचे बंगल्यात लावली तेव्हाच बाहेरच्या कर्दळीने माझे लक्ष वेधले होते पण आज आम्ही पाषाणला जायला निघालो होतो.
का कोण जाणे माझे पहिलेच चित्र बिघडले आणि मग मूडच येईना. नंतर एक ब्रश-स्केच व एक पोर्ट्रेट ही  काढले पण तरीही मूड काही आलाच नाही. आज घरी लवकर या अशी त्यांना तंबी असल्याने सारे लक्ष घड्याळाकडॆ लागलेले. मग काम संपवित दोघेही घरी परतलो.
त्यांचे बंगल्यात पाऊल टाकले मात्र, त्या कर्दळीने परत माझे लक्ष खेचलेच ! मग मात्र तिथेच ठिय्या मारीत झटपट कर्दळीला माझ्या कागदावर थबकवले !!