Archive

Archive for 15/12/2009

माझी मूर्तिकला

माझ्या मूर्तिकलेला कधी बरे सुरूवात झाली असावी ? मी सहजच आठवत बसलो होतो, पण स्पष्ट पणे काही लक्षात येत नव्हते. पण एके दिवशी मनातल्या मनात एक ललकारी ऐकू येऊ लागली. ” होळी होळीला पांच पांच गवऱ्या ! ” आणि मी एकदम माझ्या लहाणपणात अवतरलो !

असेन बहुदा मी तीन ते पाच वर्षांचा. शाळेत जायला लागलो नव्हतो. मला पक्के आठवते की सहावे लागले आणि मला एकदम दुसरीत घातले होते ! वरील नारे करीत गल्लीतील मुले होळी साठी गवऱ्या, लाकडे जमा करीत असत कींवा पळवापळवी ही करीत. आमची होळी दादा ( म्हणजे माझे वडील) सकाळी पुढील चौकात सोवळे नेसून करीत असत. नैवेद्याला हमखास पुरणाची पोळी असायचीच. हॊळीची तयारी अर्थातच मलाच करावी लागे. विशेष फुलाचा पुडा उघडून तबकात वेगवेगळी करणे, गंध उगाळून ठेवणे, होळीचे साहित्य जुळवणे इ.इ. अजून एक विशेष गोष्ट माझ्यावर सोपवलेली असे ती म्हणजे गुळा चे प्राणी म्हणजे साप,विंचू,इतर किटके आदि करून ठेवणे ! ज्यांचा नंतर होळीच्या ज्वालात स्वाहाकार होत असे ! माझ्यातल्या मूर्तिकाराचे बीज तेव्हाच अंकुरले असावे, कारण मी बनविलेल्या विंचवाला बघून ” हं लक्ष दे चावेल ” असे एकदा मला दादा म्हणाल्याचे स्मरते ! मी खूप मनलावून ते प्राणी बनवायचो, कारण पुढे वर्षभर असे प्राणी आपल्याकडे फिरकत नाहीत अशी आमची समजूत करून दिलेली असायची. अर्थात उरलेला गूळ गट्टम करायला मिळायचा हा फायदा असायचाच ! त्याची तजविज गूळ घेतानाच घेतली जायची ! आत्ता मला जाणवते की बहुदा माझ्यातल्या नव्याने अंकुरणाऱ्या मूर्तिकलेला ती दाद /शाबासकीच असावी.

पुढे पाचवीत आम्हाला हस्तव्यवसायासाठी वेगळ्या शिक्षकाची नेमणूक व वेगळा तास मिळू लागला. पेठे विद्यालयात त्यावेळी रानडे आडनावाचे शिक्षक होते व ते शाळेच्या अगदि जवळ रहात . शिवाय आमची त्यांचेशी घरगुती ओळख असल्याने मी त्यांचे कडे नेहमी जात असे कारण मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. दर गॅदरींगला ते माझ्याकडून काहीतरी वेगळे बनवून घ्यायचे. एका वर्षी आम्ही धरणाची प्रतिकृती केली होती. त्यासाठी धरणाचे पोटात बोहोरी आळीतील गांगल टिनमेकर कडून टिन चा ट्रफ बनवून घेतला होता व त्यात खरे खुरे पाणी साठवून धरणातून पडते असे ते दृश्य केले होते. सरांनी त्याला भरपूर मदत क्र्ली होतीच. पण ट्रफ ची कल्पना माझी होती म्हणून सरांनी माझी पाठ थोपटली होती. शिवाय कागदाचा लगदा करून त्याच्याही काही काही वस्तू बनवल्या होत्या. तेव्हा जे केले ते शेवटचे पुन्हा त्या वाटेला जाईल अशी मला स्वत:लाही सुतराम शक्यता वाटली नव्हती.

पण पुढे त्याचे असे झाले मी डीप्लोमाला गणितासाठी नारायणपेठे तील देशपांडे सरांचा क्लास लावला होता. क्लासला मागिलबाजूने जिन्याने जावे लागे, त्याच्या पलिकडील वाडा मूर्तिकार गोखल्यांचा होता व जातायेता ते गणपती करतांना दिसायचे. एकेदिवशी हिय्या करून गेलो व मला शिकवाल का असे विचारले. त्यावेळी रंगकाम सुरू होते, आधी हे रंगकाम शिकायला या व नंतर पुढील वर्षी मातीकाम शिका असा सल्ला दिला व त्यानुसार आमच्र रंग काम सुरू झाले. एखादे वेळी एखाद्या गणपतीचे काम करीत असतांनाही ते दिसत असत तेव्हढेच ! पुढे क्लास सुटला व आमचे तेथे जाणेही बंद झाले !

असेच कुठलेसे एक मूर्तिचे प्रदर्शन पाहून आलॊ व मनात त्याचेच विचार घुटमळत होते त्याच तिरीमिरीत बाजारातून शाडू मातीचे पोतेच घेऊन आलो. (आजही घरात पडून आहे ! कधी मूड यॆईल सांगता थोडेच येणार ) नंतर ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीतून संबधित पुस्तके आणली व माझा मीच अभ्यास सुरू केला. त्यावेळी बऱ्याच लहान मोठ्या मूर्ती घडत गेल्या. व व्यक्त व्हायचा अजून एक मार्ग मला सांपडला !

सोबत मी केलेल्या काही मूर्तींचे फोटॊ देत आहे.

ही तरूणी हातात पुजेचे साहित्य घेऊन निघाली आहे.  हा  statue  जे जे स्कूल ऑफ आर्टच्या दर्शनी प्रवेश दालनात आहे. मला त्याचा एक फोटॊ मिळाला होता त्यावरून केला.

वरील चारही फोटोज मी केलेल्या एकाच मूर्तीचे निरनिराळ्या कोनातील आहेत

वरील दोन्ही मूर्ती आता राहील्या नाहीत ! राहील्यात त्या आठवणी व फोटो.

वरील गणपती व हरताळिकांच्या मूर्ती ह्या आम्ही सध्याच्या सोसायटीत रहायला आल्या नंतर च्या वर्षी म्हणजे १९८६ च्या सुमारास बनवल्या होत्या. अख्ख्या सोसायटीतील महिलांनी त्या पुजिल्या होत्या, नंतर अर्थात त्यांचे विसर्जन केले. माझ्या कडॆ राहील्या त्या आठवणी व हे फोटो.