Archive

Archive for नोव्हेंबर, 2009

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

30/11/2009 4 comments

   

असे आहे  आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ

 

बजरंग बली कि जय !!

 

रोज सकाळी माझे स्केच बुक काखोटीला मारून हिंडायला जाण्याचा माझा शिरस्ता आहे. आम्ही १५ ते १६ ज्येष्ठ नागरिक एम.आय.टी. कॉलेज मधील हनुमानाच्या देवळाच्या पुढील बाकड्यांवर रोज सकाळी .३० ला जमतो. येथे येणारे साधारणत: साठी उलटलेले पासून ते नव्वदी कडॆ झुकलेल्यां पर्यंतच्या वयाचे असतात. त्यात ठिकठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले असल्याने गप्पामध्ये , अनुभवात विविधता असते. मी मात्र श्रवणाचे काम करीत असतो ! आमच्यातलेच एक , त्यांनी आता डॉक्टरीपेशा सोडून गायनाचा क्लास लावलेला असल्याने हे व्यासपीठ गायना साठीही वापरले जाते ! मग त्यांचे बरॊबर इतर काही जण आपलाही घसा साफ करून घेतात !  

  

आठ वाजले की सगळ्यांनाच निघायची घाई होते ! मग सारे हनुमानाच्या समोर जमतात व भीमरूपी स्तोत्र सर्व जण तारस्वरात म्हणून हनुमानाला प्रार्थना अदा करतात.

 

 
 
 
 येथून आमचा जथा हलत डुलत अण्णा कडे येतो.
 
 
 

  

निघालेत अण्णाकडे !

   

 इथेही मनसोक्त गप्पा चालूच असतात. अण्णा कडे मग चहाची फैर झडते ! अण्णा ला माहीत असते तो त्या ज्येष्ठा कडे जातो त्याने मागितले की मुकाट्याने अण्णाचे चहाचे बिल भरले जाते ! त्या नंतर आम्ही गप्पा हाणीतच आपापले घरी जातॊ.    

त्यामुळे असा हा  सकाळचा रम्य वेळ चुकवायचा म्हणजे तर माझ्या जीवावर येते ! माझा ह्या घोळक्यातील उद्योग वेगळाच असतो मी ह्या साऱ्यांना माझ्या स्केच बुकात बंदिस्त करीत सुटतो तेही निमुटपणे माझ्या स्केचिंगची शिकार व्हायला एका पायांवर तयार असतात !    

ही आहेत मी तेथे काढलेली स्केचेस !   

   

   

   

   

   

   

   

ही आहेत आमची सर्व मंडळी

   

असे आहे आमचे हनुमान ज्येष्ठ मित्र मंडळ !    

.   

नाशिकचा मुरलीधर- श्रीकृष्णजन्मोत्सव !

29/11/2009 2 comments
गेल्या १३ ऑगष्ट २००९ रोजी रात्री श्रीकृष्णजन्म झाला. माझे मन एकदम माझ्या बालपणीच्या त्या रम्य आठवणीं मधे रमून गेले. नाशिकला सरकार वाड्यासमोरील कापड बाजारात अगदि नदीच्या तोंडाशी बालाजीचे मंदिर आहे व त्याच्या समोरच्याच गल्लीत एक मुरलीधराचे मंदिर आहे. तसे अगदि रस्त्यावर नाही, थोडेसे आत आहे आणि नाशिकच्या नियमाप्रमाणे नदी कांठची घरे उंच जोत्यावर असल्याने गल्लीच्या तोंडापासूनच बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते. म्हणजे तेव्हा त्या आम्हाला तश्या वाटायच्या. ते देवस्थान एका वाड्यात्च सामावलेले आहे. आम्ही जवळच पलिकडल्या गल्लीत रहात असल्याने जाता येता केव्हाही दर्शनासाठी तेथे जात असू. श्रीकॄष्णाष्टमीच्या आधी आठ दिवसांपासूनच हा श्रीकृष्णजन्मोत्सवाचा सोहळा सुरू होत असे. दररोज मुरलीधराला एकेका वाहानावर बसवले जाई. ह्या छाया चित्र संगहात ती सर्व रूपे आपणांसाठी मुद्दाम खुली करून देत आहे त्याच्या दर्शनाचा आपणासही लाभ घेता यावा ही ईच्छा ! ……. सुरेश पेठे

ह्या फोटोतील मुरलीधराची मूर्ती मूळ  पांढऱ्या शुभ्र संगमरवराची आहे. उंची अंदाजे अडीच फूट आहे. मूर्ती उभी असून , उजवा पाय मोडपून डाव्या पायावरून नेलेला, मान किंचीत वाकलेली,  पाणीदार डोळे , मुरली वाजवीत असतानाची अशी आहे. ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावर अतिशय गोडवा आहे. मी तरी इतकी सुंदर मूर्ती आजवर पाहीलेली नाही. बिर्ला मंदिरातल्या काही श्रीकृष्णाच्या मूर्ती सुंदर आहेत पण तरीही ह्या सम हीच ! ह्या उभ्या मूर्तीला वाहनांवर बसवताना, पायांची घडी कशी घातली जात असेल ? हा प्रश्न त्यावेळी आमच्या बालमनापुढे कायम पड असे.  पुढेही कित्येक वर्षे तो होता ! श्रावणीच्या वेळी मी ह्या मूर्तीला स्पर्श करीत पंचामृताने स्नान घातलेले आहे,   ह्याचा आनंद काय वर्णावा ?

वरील फोटोत मुरलीधराला अर्धनारी नटेश्वरा च्या रूपात साकारले आहे. जरा नीट निरखून त्यातील बारकावे पहा. एकीकडे व्याघ्राजिन पांघरले आहे  तर दुसरीकडे पैठणी  नेसवली आहे !  उजवीकडे भरगॊस मिश्या तर डावीकडे नाकाच्या चाफेकळीवर सुबक नथ ! गंध, केस. इतर दागिने…अगदि रेलचेल आहे !  आहे की नाही गंमत ! अधिक निरखून पहाल तर  डोळ्यांतील भाव सुध्दा प्रत्येकाच्या स्वभावा नुसार वेगळे आढळतील .

इथे मुरलीधर बनला आहे राधा ! तिचा तो पुढे घेतलेला शेपटा पहा त्यावर फुलांची वेणी पण घातली आहे ! हल्ली मुलींना लांब केसच नसतात की आयांना आवरायला वेळच नसतॊ… श्रीकृष्णच जाणे ? सगळ्याचेच केस लांडे लांडे !!  साडी बघा कशी चापून चोपून नेसवली आहे ! नाकात नथ, कमरेला कमरपट्टा, पायात पैंजण ,हातात घड्याळ ही असायचेच ! अशी ही बावरी राधा  कोणाची वाट पहात असणार ? काय तिचा तो थाट  !

आता मुरलीधराला नागावर बसवले आहे.  कालिया मर्दनानंतरतो नमल्यावर त्याने आपणहून बसू दिलेलॆ दिसत्येय ! पायाकडे लक्ष गेले असेलच ! आत्तापर्यंत उभा असलेला असा कसा बरं बसला ? आम्हाला लहानपणी ह्याची खूप गंमत व अप्रूप वाटायचे ! पुढे थोडे मोठे झाल्यावर  आमच्या बाल गणपती उत्सवात मी ही एका उभ्या गणपती ची स्थापना करायचॊ व त्याला दहा दिवसात निरनिराळ्या वाहनांवरून सफर करून आणायचो !

ह्या वरील फोटोत  दिसतोय तो मुरलीधराचा नेहमीचा पोषाख ! कधीही गेलं तरी प्रसन्नच वाटावे असे हे ध्यान !

इथे मुरलीधर गरुडावर बसला आहे ! गरूडाने पायात नागाला पकडलेले आहे ! गरूड सुध्दा किती रुबाबात आहे , त्यालाही भान आहे आपण कोणाला पाठीवर घेतले आहे ते !

कशी शांत झोपाळ्यावर बसून बांसरी वादनात तल्लीन झाली आहे स्वारी ! गालातील हंसू स्पष्ट दिसतंय , काय राधाबाईंच्या आगमनाची वाट पहाणे चालू आहे वाटतंय ! काहीतरी मस्करीची युक्ती मनात घोळत असलेली दिसत्येय !!

ह्या फोटोत मुरलीधर चंद्रा वर बसला आहे ! आता आम्ही सुध्दा चंद्रावर जाण्याच्या तयारी आहोत ! पण असं आम्हाला तिथे बसता येईल ?

ह्या फोटोत मुरलीधर मोरा वर बसला आहे

ह्या फोटोत मुरलीधर  बनला आहे, त्याच्या लहान पणीचा जिवलग,   पेंद्या !  डोक्यावर घोंगडे,  हातात काठी , सभोवती आजु बाजूला गायी चरत आहेत.

आपला,
सुरेश पेठे
प्रवर्ग: वर्णन

माझे मनोगत

27/11/2009 2 comments

माझे मनोगत मी माझ्या पहिल्या नविन ब्लॉग मधे प्रकाशित केले खरे पण मनातील रूखरूख तशीच राहिली.


कश्या साठी हा नवा ब्लॉग ? ..’.व्यक्त ’ होण्या साठी ? मग मी व्यक्त तर आधीही होत होतोच की … मग वेगळे काय? माझा एकूण ऑर्कुट प्रवास मी कधीतरी आपणास ओघाने सांगीनच.

त्यानिमित्ताने कवितेच्या प्रांगणात एकीने मला हात धरून आणले ! ’काव्यांजली’ नावाची ती कवितेची कम्युनिटी आहे. तिथे मी काही काळ रमलो कवितांच्या  माध्यमातून ’व्यक्त’ होत राहीलो .’कवितेच्या गावाची’ सफरही घडली. तिही कवितेचीच कम्युनिटी  आहे. तोही प्रवास , वर्णन करीन एकदा. मग स्वत:च्या कवितांच्या कम्युनिटी … चित्रांचे अल्बम , इतरही कम्युनिटी, ब्लॉग सुध्दा झालेत पण ह्या स्व केद्रीत व्यक्त होत राहील्याने व्यक्त होण्यातील तळमळ शांत होण्या ऐवजी   वाढतच राहीली…..म्हणून त्या साठी हा नवा ब्लॉग !

आमचे वेळी कॉम्युटर नव्हते ! साध्या कॅलक्युलेटर नेही आम्हाला तेव्हा चकीत केलेले होते. माझ्या बरोबरचे अजूनही कॉम्प्युटरला सामोरे जायला घाबरतात. मी ही त्यातलाच एक असायचो ,पण एका बेसावध क्षणी त्याची गाठ पडली व त्याच क्षणी त्याचे प्रेमात पडलो. पुढे नेटची ओळख झाली व आमच्या ’ नेट प्रॅक्टीस’ ला जोरात सुरुवात झाली. अनेक मित्र मैत्रीणी मिळाल्यात ! आता  ते आणि तो च मला सतत काही न काही शिकवित रहातात !

आताही एक अशीच  मैत्रीण भेटली. ब्लॉग मी आधीही वापरलेत, पण ह्या तिच्या ब्लॉग विश्वाने मी अचंबित झालॊ. मला हा व्यक्त हॊण्यातला आविश्कार नवा हॊता. मला तॊ आत्यंतिक आवडला ! आता हा ब्लॉग म्हणजे माझ्या मनाचे साम्राज्य असेल. मात्र आपण कधीही त्यात डोकावू शकता !

अजून एक वैशिष्ठ्य त्यात असणार आहे. आता ह्या ब्लॉग मधे जरी मी सतत डोकावत असणार असलो तरी तॊ माझ्या वयोगटाचे प्रतिनिधित्व करणार आहे. माझी तशी धारणा असणार आहे.  तेव्हा हा नवा प्रवास माझा असूनही त्या अनुषंगाने माझ्या पिढीचा असेल. जे माझ्या वयोगटातील असतील त्यांना कदाचित पुन:प्रत्ययाचा आनंद घेता येईल. इतरे जनांना त्यामुळे, आमचीही काही बाजू असू शकेल, ती समजून घेण्याची व त्या बाबत आपल्या शंका-कुशंकांचे समाधान करून घेण्याची आयती संधी मिळू शकेल !

हा माझा नवा ब्लॉग, नव्याने– मुक्तपणाने व्यक्त होण्याचा प्रयत्न आपल्या साथीने आणि शक्य तितका नियमीत सुरू करणार आहे.


सुरेश पेठे

 

 

प्रवर्ग: प्राथमिक टॅगस्

येss रे मना येरेss मना !

ही श्रीं चीच इच्छा असावी !

गेले कित्येक दिवस मी एका अनामिक अस्वस्थतेत होतो. काहीतरी करायचे आहे आपल्याला पण सुचत तर काहीच नव्हते. गेले वर्षभर मी ऑर्कुट वरील माझ्या प्रोफाईल वर रोज एक नवे चित्र टाकीत आलो. खूप जणांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. हा माझा संकल्प आता ह्या डिसेंबर अखेर पुर्ण होणार …
ही त्याची लिन्क
पण आता पुढे काय ? ह्या विचाराने अलिकडे मला कही रात्रींनी जागवत ही ठेवले. काहीतरी वेगळे करावे ही इच्छा स्वस्थ बसू देईना.
मागे अश्याच एकावेळी एका मैत्रीणीने माझ्या कवितां साठी ब्लॉग विश्व उघडून दिले. काही दिवस त्यावर कविता टाकीत राहीलो. हाच तो माझ्या कवितांचा ब्लॉग. अजून सुचतील तश्या फक्त माझ्या स्वत:च्याच कविता येथे वाचायला मिळतील.
पुढॆ अश्याच एका मैत्रीणीने माझ्या चित्रांवर चर्चा आरंभली तेव्हा स्केचिंग संबधी माहीती व चर्चा करण्या साठी अजून एक ब्लॉग तयार झाला !हाच तो ब्लॉग. तेथेही स्केचिंग बाबत काही काही व माझी काही स्केचेस टाकणार आहेच. ही पण चर्चा राहू दे चालू अशीच !
आताही मला अशीच एक मैत्रीण भेटलीय नेटवर ! ( माझ्या ह्या योगाचा तुम्हालाच कां मलाही हेवा वाटतोय !! ) तन्वी,( माझ्या बाल मैत्रीणी ची नात ! ) ती माझ्या चित्रांच्या प्रेमात तर मी तिच्या ब्लॉगचे प्रेमात ! ( प्रेमांचे असेच नेहमी त्रांगडॆ असते का ? ). काय सुंदर ब्लॉग्स लिहीते की यंव! … आणि मग मात्र मला माझा पुढील रस्ता साफ दिसू लागला. हा नवीन ब्लॉग हे त्याचेच फळ !
ह्या ब्लॉगचे नाव आहे …’ येss रे मना येरेss मना ! ’  इथे आता माझ्यावर माझ्या मनाचेच राज्य चालणार ! जे जे मनात येणार ते ते इथे येणार…नो आडपडदा !.. नो वेळ काळाचे बंधन….मग त्यात कधी कुठल्या आठवणी,… कधी एखादी सुचलेली वा आवडलेली कविता… एखादे चित्र माझे वा कुणाचेही असेल….काय वाट्टॆल ते ह्यात असेल !… मी मनाला आडवणार नाही….चुकून कुणाचा नामोल्लेख झालाच तर मला माफ करावे ..कारण काहींना तो तसा आवडत नाही ह्याची मला कल्पना आहे…तरी पण कधी कधी नाईलाज को क्या इलाज ? नाही का ? ( मी शक्यतो काळजी घेइनच ! )
तर असा हा माझा ब्लॉग मी आपणांसमोर घेऊन येत आहे…. कधी काही आवडलेच तर  आणि …समजा नाही आवडले तरीही मला आपली प्रतिक्रिया हवीच..देणार ना ?
सुरेश पेठे
प्रवर्ग: प्राथमिक टॅगस्