Archive

Archive for 17/01/2010

माझे मनोगत

आजचा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह मेळावा अतिशय सुनियोजित पणे व दिमाखात पार पडला. ६१ जणांची उपस्थीती होती.  आजच्या मेळाव्याचा एक आयोजक ह्या नात्याने मी माझे खालील  मनोगत प्रास्ताविकात मांडले.

अधिक माहिती व फोटो उद्या पोस्ट करतो.

माझे मनोगत


१)  मराठीतून ब्लॉग लिहीणाऱ्यांचा एक स्नेह मेळावा भरवावा ह्याबाबत मनात कल्पना येताच मी अनिकेतशी बोललो. तो ही माझ्या मताशी सहमत आहे हे बघीतल्यावर मी लगेच एक पोस्ट तयार करून ब्लॉगवर टाकली. त्यावेळी त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल ही कल्पनाही आमचे मनात नव्हती. पण मिळालेल्या प्रतिसादावरून अश्या मेळाव्याची आवश्यकता आहे हे  आता जाणवते. आज आपण मोठ्या संख्येने जमून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

शिवाय जगभरातील मराठी ब्लॉगर्स चे डोळे आजच्या मेळावाच्या यशस्वीतेकडे लागून राहीलेलॆ आहेत. काहींची नावे घेतलीत तर ती अप्रस्तुत ठरू नये जसे अनुजा व तन्वी मस्कत, रोहन चौधरी, भाग्यश्री आदि अमेरिकेतून, तर अजून एक भाग्यश्री इंदूर हून, अगदि मुंबई, नागपूर, कोल्हापूर,नाशिक, औरंगाबाद, सांगली ते फलटण पर्यंत सर्व दूर पसरलेले आहेत.  आज ह्या मेळाव्याला  निरनिराळ्या  क्षेत्रातील अनेक प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थित आहेत. मेडीया व वर्तमान पत्रांनीही ही कल्पना उचलून धरली आहे. मी इथे उपस्थीत असलेल्या या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.

२)  मध्यंतरीच्या काळात अनेक जणांनी अनेक अपेक्षा वर्तवल्या आहेत. मात्र आज आपण येथे प्रामुख्याने जमा झालॊ आहोत ते एकमेकांच्या व्यक्तीश: ओळखी करून घेण्या साठी.  कारण आत्ता पर्यंत आम्ही भेटत आलो ते आंतर्जालावर पोस्ट नाहीतर कॉमेंटसच्या रूपाने ! त्या नंतरच आपल्याला काय काय करता येईल हे आपण पहाणार आहोत.

३)  आपणा पुढेही अनेक अडचणी आहेत. सर्व प्रथम आपण असे किती जण ब्लॉग्स लिहीतो. आपले ब्लॉगचे विषय काय काय आहेत?  कुठल्या कुठल्या संकेत स्थळांवर आपण  ब्लॉगस लिहीतो. अशी एक सर्वकश  यादी  बनविणे हे आपले सर्वात प्रथम काम असेल व त्यासाठी आपणा सर्वांनी ती ती माहीती पुरवणे ही आपल्या पुढील कामाची प्राथमिकता असेल.

४)  अश्या ब्लॉगची सुविधा आपणा पर्यंत पोहोचवणारे कोण कोण आहेत व त्यांचा तौलनीक अभ्यास. त्यातील असलेल्या सुविधा वा कमतरता. मराठी टाईपिंग च्या सुविधा त्यातील आपल्याला येणाऱ्या अडचणी.इत्यादि वर चर्चा करून निघणाऱ्या मार्गांबाबत विचार करणे.

५)  तसेच, अनेक ब्लॉगर्स  अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करतात. अश्या ब्लॉगर्स च्या ब्लॉग मधून निर्माण होणाऱ्या वाङमयाला साहित्य संमेलनातून काही प्रोत्साहन मिळू शकते का व त्याचे छापील रूपांतरा बाबतची शक्यता व संबधितांशी वार्तालाप. अश्या वाङ्मयातील होणाऱ्या चौर्यकर्मा बाबत काय करता येईल ह्याबाबत विचार वगैरे.  मी येथे फक्त अश्या काही समस्यां व मुद्यांचा अगदि ओझरता परामर्श घेतला आहे आपल्यातील चर्चेतून त्यांचे समग्र दर्शन व त्यावरील उपाय ह्याचा उहापोह होईलच.

६)  त्या साठी आपण सारे एकत्र आलो व संघटीत बनलो तर ब्लॉगर्स च्या अडचणींवर संघटीत पणाने मात करणे शक्य होईल. तेव्हा ह्या आजच्या मेळाव्याच्या रूपाने जमलेल्या सर्वांना मी आवाहन करीत आहे की सर्वांनी  संघटीत सामना करण्यासाठी एक होऊया.

७)  त्यासाठी लवकरच आंतरजालावर एक ग्रुप स्थापन करू. म्हणजे त्या ग्रुपच्या व्यासपीठावर  जगभरातील मराठी लिहीणारे ब्लॉगर्स सखोल चर्चा करू शकतील. तसेच ठराविक कालाने आजच्या सारखेच पुन्ह: पुन्हा एकत्र जमून चर्चा विनिमय करून सर्वानुमते निर्णयही घेऊ शकु व त्याचा सतत पाठपुरावा करू शकू. मराठी ब्लॉगर्स  साठी काहीतरी ठोस करण्याची इच्छा मनात बाळगुया. अशी उत्कटता व पारदर्शकता हेच आपले प्रमुख उद्दीष्ट असायला हवे.

जय महाराष्ट्र ! जय भारत !

सुरेश पेठे

पुणे
१७ जानेवारी २०१०
Follow

Get every new post delivered to your Inbox.