Archive

Archive for 07/01/2010

जादूचा ’ पत्ता ’संगम प्रेस

07/01/2010 6 comments
अगदि बरोबर, १९८३ चाच तो काळ होता. भावाने मला कोथरुड चा प्लॉट बघायला पाठवले होते. प्रमुख खूण होती संगम प्रेस ही ! संगम प्रेस जवळ जी विहीर आहे, त्याचे बरोबर उजवीकडे वळून पाचशे पावले गेलॊ की जो दगड पुरलेला दिसेल तो आपल्या प्लॉटचा आग्नेयाचा कोपरा…इ. इ.
त्या काळात अर्ध्या मैलाच्या परिसरात एकही नाव घेण्या सारखी वास्तू नव्हती. त्यामुळे संगम प्रेस शोधायला कष्ट पडणार नव्हतेच. त्या नंतर आमची स्कीम सुरू झाली १९८४ मध्ये व १९८५ ला आम्ही रहायला पण आलो. तेव्हा धड रस्ता नव्ह्ता, ड्रेनेज नव्हते, एकट दुकट मिणमिणते दिवे ! अंधार पडला की बाहेर पडायची भितीच वाटायची. महत्वाचे सागायचे म्हणजे तेव्हा वास्तुशांतीला बोलावतांना पत्ता देतांना बिनदिक्कत सांगीतले गेले की अरे कोथरूड संगम प्रेस कोणालाही विचार. त्याचे समोर दिवे दिसतील तेच माझे घर.
पुढे संगम प्रेस व माझे घर ह्यामधे अजून एक दोन वास्तू उभ्या राहील्या. तरीही माझा पत्ता सांगतांना संगम प्रेस ’समोर’ ऐवजी ’ जवळ’ इतकाच फरक झाला. मध्यंतरी कोथरूड चा काया पालट झाला. एखाद्या भागाची डेव्हलपमेंट इतकी फास्ट होतेय की त्याची गिनीज बुकात नोंद घ्यावी लागली. तरीही कित्येक वर्षे माझ्याया  पत्त्यात बदल करावा अशी कधी जरूर पडॆल असे कधी वाटलेच नाही. खालील फोटो त्याची साक्ष द्यायला ताठ मानेने उभा होता.
हाच तो काही दिवसांचा सोबती !
आता परिस्थिती बदलत गेली आहे. नुकतेच ही वास्तु पाडायला सुरूवात झाली आहे. एव्हढा मोठा प्लॉट मोकळा रहातोय हेही महदाश्चर्य होतेच. प्लॉट इंडस्ट्रीअल एरीयातील. पण आता असली आडकाठी कुणालाच येत नाही.
ह्या पत्र्यांमागे होता, जो गायब होतोय, जादूचा ’पत्ता’
लवकरच तेथे एखादा मोठ्ठा मॉल उभा राहील. रस्ता ओलांडायला पोलीस तैनातीस असेल. सगळीकडॆ झगमगाट झालेला असेल, रहदारी ओसंडून वाहू लागलेली असेल. अडीच तीन दशकां पूर्वी तेथून जातांना भिती वाटेल अशी परिस्थिती होती हे्ही सारे विसरून गेलेले असतील.
एक मात्र होईल, माझ्या पत्त्या मधील संगम प्रेस हा ’पत्ता’ जादूने गायब झालेला असेल !!

मराठी ब्लॉगर्स चा संकल्पित मेळावा

मराठी ब्लॉगर्स संकल्पित मेळावा
मी व अनिकेत सहज गप्पा मारीत असतांना हा विचार मनात चमकून गेला. भुंगा च्या ब्लॉग वर त्यानी काहींची मते मागवली आहेत की ” मराठी ब्लॉगर्स मीट व्हावी का? हो… चांगली आयडिया…!!! ” वगैरे. त्यामध्ये जवळ जवळ माझ्यासकट पंधरा जणांनी व्हावी असे मत नोंदवले होते. मी हाच धागा पकडला होता, व माझ्या पुढे मराठीब्लॉग्स डॉट नेट वर भेटणारी मंडळी होती. अनिकेत म्हणाला म्हणून मी लगेचच एक पोस्ट तयार करून टाकली. सुरवातीला त्याला कट्ट्याचे स्वरूप येऊ लागले होते पण कालांतराने ते अधिक चळवळ स्वरूपात पुढे येऊ लागले. हा मेळावा माझ्यामते ह्या स्वरूपात प्रथमच होत असावा, त्यामुळे कुठलेही फाटे न फोडता सर्वांनी प्रथम एकत्र यावे ही भुमिका मनात ठेवून ह्या मेळाव्याला सर्वांनी यावे हाच मी आग्रह धरला आहे. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी असे मला ठाम वाटते. पुढे सर्वानुमते चर्चा करीत ,निर्णय घेत त्याचे स्वरूप पक्के करीत जाऊया. येथे मी माझे स्वत:चे मत मांडत आहे. प्रत्येकाने आपापले मत येथे उत्तरात मांडावे अशी अपेक्षा आहे. तेच मुद्दे मग आपण पुढील मेळाव्यातून चर्चेला घेऊ शकू.
आम्ही हा मेळावा घेण्याचा जेव्हा विचार केला त्यावेळी त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळॆल अशी कल्पना केलेली नव्हती, पण त्या निमित्ताने सगळे जमत असतांना ह्या बाबत  व इतर वाचकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा करून काही ठाम निर्णय घ्यावेत असे मला वाटते. कदाचित १७ जानेवारी २०१० चा मेळावा त्यासाठी अपुरा पडला तर पुन:पुन्हा त्यासाठी आपण जमू पण आता ही चळ्वळ त्या स्तरा वर न्यायचीच असे तरी ह्यावेळी ठामपणे ठरवूया. या सर्वांनी आपापले विचार घेऊन या !
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
हा मेळावा फक्त पुण्यातील लोकांसाठी आहे का?
अजिबात नाही. पुणे हे पहिल्या मेळाव्यासाठी निवडलेले ठीकाण आहे. जगभरातील
मराथी ब्लॉग लिहीणारे ह्यात  समाविष्ट आहेत. कोणीही स्वत:ला अलग समजू नये व एक दिलाने येथॆ यावे. सध्या मिळत असलेल्या प्रतिसादावरून ह्या पुढे ही चळवळ स्वरूपात रूपांतरीत होईल असे वाटते. तेव्हा पुढील मेळावे अन्य ठिकाणी सुध्दा करू शकू.
एक मुद्दा होता की हा मेळावा फक्त मराठीब्लॉग्स डॉट नेट वरील मराठी ब्लॉगर्स साठी सिमीत आहे का ?
नाही. माझी इच्छा सर्व मरा्ठीत ब्लॉग  लिहीणा़ऱ्या ब्लॉगर्स नी एकत्र यावे ही आहे. त्यात फक्त मराठीब्लॉग्स डॉट नेट वरील नोंदलेलेच असावेत असे नाही.
अजून एक मुद्दा आहे की मराठी माणूस पण इंग्रजीत ब्लॉग लिहीतात त्यांनी मेळाव्यात सहभागी व्हावे का?
इंग्रजीत ब्लॉग लिहीणारे पण मराठी माणूस म्हणून तो मेळाव्यात सहभागी असावा हे मला पटत नाही. त्याने मेळाव्याला जरूर यावे पण त्याने मराठीत लिहीण्यास उद्युक्त  व्हावे हा त्या मागील प्रमुख उद्देश आहे. अन्यथा इंग्रजी ब्लॉग्स इंग्रजाने लिहीले असले काय वा मराठी माणसाने लिहीले असले काय त्यात फरक तो काय? आणि जो माणूस आपले विचार इंग्रजीत मांडू शकतो त्याला ते आपल्या माय-मराठीत मांडायला काय अडचण आहे ?
एकूणच मराठीची काय अवस्था होऊ घातली आहे ते दिसतेच आहे. आमचेच…आम्हीच निवडून दिलेले आमचे शिक्षण मंत्री बिनदिक्कत, अनुदान द्यायला लागते म्हणून मराठी शाळांना सरळ सरळ परवानगी नाकारायला लागले आहेत ह्यापेक्षा दुर्दैव ते कोणते ? आम्हाला कित्येक कोटी खर्च करून समुद्रात पूल बाधता येतो कीवा पुतळे उभारता येतात पण शिक्षणा सारख्या बाबीला आम्ही अनुत्पादक म्हणून अव्हेरतो हा दैवदुर्विलास आहे दुसरे काय ?
आम्ही जगू ते मराठी म्हणूनच. आम्हाला इतर कुठल्याही भाषे बद्दल आकस नाही. मावशी कितीही चांगली असली तरी तिची जागा माय नंतरच.
आपण आपली चळवळ मराठीत ब्लॉग लिहीणाऱ्यां पुरतीच ठेवावी , इतर भाषेत ब्लॉग लिहीणाऱ्या मराठी माणसाने मराठीतही लिहीण्यास सुरूवात करावी. मराठी नसणाऱ्या पण मराठीत ब्लॉग लिहीणऱ्या मंडळीचे ही चळवळ स्वागत करते !
ब्लॉगचे स्वरूप काय कसे असावे ?
जगात अनंत गोष्टी नित्य घडत असतात. आपण त्या पहात असतो, अन्य लोकांनी त्या त्या घटनेवर मांडलेली मत-मतांतरे वाचित, ऐकत, बघत असतो. आपले मन घडणाऱ्या गोष्टींवर आपल्या पध्दतीने विचार करीत असतेच व त्यावरून आपल्या मनातही त्याबाबतचा एक ठसा तयार होत असतो. तसेच आपले मन सर्वात चंचल असते. ते कधी, कुठल्यावेळी, काय मनात आणेल, ठेवेल ह्याचा कुठलाच भरवसा नसतो. हे सांठलेले, करीत असलेले मनातले संवाद कोणाशी तरी बोलावेत, सांगावेत त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यावी अशी आंस असते. ब्लॉग हे एक त्यासाठीच एक साधन आहे. तेव्हा आपले मनोव्यापार, ज्यात मी असणारच, त्यात आला तर ?…तो ही येणारच…. आणि माणसाला दुस़याच्या मनात डोकायला आवडतेच !
तेव्हा ब्लॉगला त्याबाबतीत कुठलेही बंधन नसावेच. असलेच तर ते स्वत:चेच ! त्यावरूनच माणसाच्या  विचारांची परिपक्वता, सौंदर्य दृष्टी, सुसंस्कृतपणा ह्याचे दर्शन घडणार आहे. कोणीतरी डोकावत आहेच, तेव्हा आपल्या घराचे दार किती किलकिले ठेवायचे हे स्वत:च ठरवा, नंतर तक्रार करू नका.. कोणी फारच डोकावते आहे म्हणून !
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
Follow

Get every new post delivered to your Inbox.