Archive

Archive for डिसेंबर, 2009

प्रामाणिकता अजून टिकून आहे

सकाळी नेहमी सारखा हिंडून परतत होतो. आमच्या इथे थोड्या अंतरावर नवी खाद्य संस्कृती उभी राहू लागली आहे. अनेक टपऱ्या कोणा- कोणाच्या (माहित नाही) तरी आशिर्वादाने उभ्या रहात आहेत. तेथे सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची सध्या रेल्चेल असते. तेथे नवीनच एक टपरी उभी राहीली आहे. त्याचेकडे दावणगिरि लोणी स्पंज डोसे मिळू लागले आहेत. आम्हा सारख्या उरलेल्या दातांवर ज्यादा जबरदस्ती नको असे वाटणाऱ्यांना तर हा मऊशार डोसा एक वरदान आहे.
सध्या माझी नात व मुलगी नाताळच्या सुटी मुळे माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे रोजच काही न काही खादाडी करणे वा आणणे चालूच असते. आज मनात आले व त्याप्रमाणे तीन लोणी स्पंज ( एकात साधारणत: ५” व्यासाचे तीन डोसे असतात ) व मला एक साधा असे पार्सल घेऊन घरी खुशीत परतलो व पार्सल नातीकडे दिले.
मी बाहेरच्या खोलीत होतो. नातीने खुशीत पार्सल उघडले, पण थोड्याच वेळात आतून धूसूक फूसूक ऐकू येऊ लागली. आतून अर्धवट काही काही ऐकू येऊ लागले !…”धांदरटपणा जायचा नाही अजून”….” एव्ह्ढेच ?”…..” मी किती घेऊ ?”…… ” फसवलं असणार बहूतेक “… “आता तो काय देणार आहे ?” ” सगळॆ ह्यांना फसवतात…वगैरे वगैरे. मी अत आलो, तेव्हा असे लक्षात आले की त्याने एकच स्पंज दॊसा दिलेला होता. मी चपला पायात सरकावत परत जायला बाहेर जाई पर्यंत मला ताशेरे ऐकू येत होतेच. पाऊण तास उलटून गेलेला होता त्यामुळे मलाही शंका येऊ लागली होती की आपण गंडलो गेलो आहोत !
पण, मी त्याचे कडे जाऊन काही सांगणार तेव्हढ्यात तोच आपणहून गयावया करीत संगू लागला, “सॉरी सर! गलती हुई,ये दोनो यहा ही थे, आपके पार्सल मे डालना मै भूल गया. आपको यहा तक आना पडा ! मुझे माफ करना !” …. शिवाय ते दोन्ही डोसे बाजूला ठेवित मला दोन नवीन गरम गरम करून दिले. परत एकदा ” सॉरी सर ! ” म्हणाला…..माझा राग कुठल्या कुठे पळून गेला.
मनात आले ’ प्रामाणिकता  अजून  टिकून आहे ’


बिल्डींग मॉडेलींग

अपर्णाचा हट्ट आहे म्हणून हे सांगतोय. थोडे लांबलचक हॊणार आहे पण कंटाळू नका
खरं सांगायचं तर आयुष्य कशी वळणे घेईल हे कोणालाच सांगता येणार नाही. माझ्या मूळ आवडी आणि नंतर चे शिक्षण…नोकरी व्यवसाय ह्यांचा परस्परांशी तिळमात्र संबध नाही ड्राईंग हा विषय मला अगदी लहान पणा पासून गुंजवायचा. पण तो एकच विषय नाही सगळ्याच विषयात मी तितक्याच तन्मयतेने रमायचो  तसेच कुठलीही वस्तू मला कधीच टाकावू वाटली नाही…. मला वाटते त्या वयातील  सर्वांनाच ह्याची भूरळ पडत आसावी… पण मला जरा ज्यास्तच …कारण मधूनच माझ्या मोठ्या भावाला माझा खजिना तपासायची ( दुर्बुध्दी, असे मला तेव्हा वाटायचेच ) इच्छा झाली की आमचा खजिना पुरा साफ झालाच समजायचा!
त्यात मग काय नसायचे ? काडेपेट्या, बॉक्सेस, कांचा, सुतळ्या, दोरे, रंगीत चिंध्या, जुने तुटके, मोडके खेळ… आणि काय काय वाट्टेल ते…..तेव्हा पासून काडेपेट्यांची ..खोकींची गवतांची घरे झोपड्या करणे… त्यापुढे प्राणी मांडणे हे उद्योग चालायचाचे. शिवाय मला त्यावेळी एका भावाने ( आम्ही एकूण १४ भावंडे पैकी मी शिल्लक बघीतलीत ९, त्यातील सर्वात धाकटा.. मी शेंडेफळ अर्थात्च लाडाचा !) मेकॅनो आणून दिलेला होता, मग तर काय …
पण खरी गोडी व त्यातली कलात्मकता जाणवली शाळेत पाचवी ते सातवी मध्ये जेव्हा आम्हाला हस्तव्यवसाय शिकवायला रानडॆ नावाचे सर आले होते …. मागे मी त्यांच्या बाबत वर्णन केलेले आहेच.त्यांचे माझ्यावर प्रचंड प्रेम … त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्यात व करूनही घेतल्यात. त्यांनी तर मला एक गंमतीचा खेळ दिला होता. ..कार्ड शीट वर डाय कट केलेली प्रिंटेड  छोटी छोटी निरनिराळी घरे. झाडे, बसेस,अख्खी टाऊन्शिप ती मांडून मी त्यात तासन तास रमून जायचॊ …ती  फोल्ड करायची, एकमेकात अडकावयाची की झाली घरे तयार !. एकूण ती सर्व १७-१८ तरी असावीत. पुढे ती माझ्याकडून हरवली गेलीत कींवा कोणी तरी ती माझ्या नकळत मारलीत तरी!! मी तर घाबरून गेलो होतो की सर आता माझी चांगलीच हजेरी घेणार. मला हे फार जिव्हारी लागले व आपण त्यासारखे काही तरी बनवायचेच ह्या ईर्षेने मी ती घरे बनवलीत जी तुम्ही मागिल पोस्ट मधे बघीतली असतील. रानडे सरांना ही ती मी दाखवली, त्यांना मी त्यांचा तो खेळ हरवल्याचा राग येण्या ऐवजी ही घरे खूप आवडलीत व मला मिळाली शाबासकी … धपाट्या ऐवजी !
नंतर सुरवातीला सांगीतलेला  प्रमाणे माज्या शिक्षणा बाबत उहापोह होत मी पुण्यात सिव्हील इंजीनीअरींग डिप्लोमाला डेरेदाखल झालॊ. सिव्हीलच का तर माझा मोठा भाऊ सिव्हील मध्ये ग्रॅज्युएट झालेला होता व इथे नोकऱ्य़ा फटाफट मिळतात म्हणून… मलातर कशाचाच गंध नव्हता . तरी एकदाचा डिप्लोमा झालॊ व अपेक्षे प्रमाणे, तशी बऱ्या पगाराची नोकरीही लागली ह्या सर्व गोष्टीत टेक्नीकल ड्राईंग हा विषय मात्र आवडीचा निघाला.
पण मूळ स्वभाव, आवडीनिवडी मला थोड्याच गप्प बसू देतात ! एकदा एक कॉन्ट्रॅक्टर सुताराला घेऊन माझ्याकडे आला होता. त्याला एखादे कपाटाचे डिझाईन साठी हवे होते स्वत:साठी. मी माझ्या पध्दतीने काढून देऊन त्याला समजावले, अर्थात त्याला किती समजले असेल , मला शंकाच होती.
घरी आल्यावर त्यावर माझा विचार सुरू झाला व पहीले माऊंट बोर्ड मध्ये मॉडॆल तयार केलॆ. त्याचे उघडझाप करणारे दरवाजे थोडॆ डोके खाऊन गेले पण वरच्या बाजूने टांचण्या लावून तो प्रश्न सोडवला. हे मॉडेल त्याला खूप आवडले व पहील्याने त्याने त्याबद्दल  मला १५ रु दिले. ( त्या काळात  रु १५ कमी नव्हते , माझॆ अर्ध्या महीन्याचे खानावळीचे बील भागले होते. ) मला हा अर्थार्जनाचा नवा मार्ग सापडला होता.( माझे शिक्षण कर्जावर झाले. माझ्या खर्चाचा हिशेब वडिल स्वत: तपासत, एव्हढासाही वायफळ खर्च त्यांना खपत नसे. मग माझ्या आवडी-निवडी छंदाना कुठून पैसे मिळणार ? माझी पहीली विन्स्टन न्युटनची रंगाची पेटी  रु २५ ला घेतलेली मी आजही वापरतॊ…. अर्थात आता त्यातील रंग भारतीय आहेत…. कारण तश्याच नव्या पेटीची किंमत आज रु ५००० च्या पुढे आहे !)
तो कॉन्ट्रॅक्टर बाहेर बंगल्यांचीही कामे घेत असे. एकेदिवशी तो माझ्या कडॆ एका बंगल्याचे ड्राईंग घेऊन आला. एरव्ही मी त्याला मटेरीअल ची क्वांटीटी काढून देण्याचे काम जाता जाता करून देत असू. आज तो विचाराला आला होता व मी त्याचे मॉडेल करून द्यावे अशी त्याची इच्छा होती. मी त्याला थोड्याश्या मेहनतीने ते करून दिले त्याचे मला रु २५ दिले होते. पुढे मी त्याला मी बरीच मॉडेल्स करून दिलीत. तेव्हा मी माझा याशिका ६३५ हा पहीला वहीला कॅमेरा घेतला होता ( ज्याने मला लग्नांच्या फोटोच्या बऱ्याच ऑर्डर्स मिळवून दिल्यात.) . पुढे एका आर्किटेक्ट मित्रानेही अशी कामे मिळवून दिली होती.
सगळ्यांचेच फोटो काढलेले नाहीत पण काही फोटो पुढे देत आहे.

वरील फोटॊ व खालील फोटोतील वरचे दोन, हे एकाच  मॉडेल ची तीन रुपे आहेत, तर त्या खालचे चित्र त्याच बिल्डींगच्या प्रत्यक्ष बांधकामाचे आहे.

सर्वात शेवटचे ले आऊट मॉडेल आहे.

ही खालची चार ही चित्रे एकाच मॉडेलची आहेत. ही बिल्डींग पुणे येथे रास्ता पेठेत बांधली गेली. त्या वेळची पुण्यातील पहीली सात मजली बिल्डींग !

त्याचे मॉडेल करायचे मला सदभाग्य मिळाले !

खास तन्वी साठी !

हा ब्लॉग खास तन्वी साठी आहे. पण असे असले तरी माझे सर्व मित्र मंडळी ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात बरं का !
मी ही आठवण सांगत आहे त्यावेळी मी असेन बहुदा चवदा किंवा पंधरा वर्षांचा, माझ्या बगलेत आहे सर्वोदय माझा पुतण्या ( जन्म १९५६ ) तर मागे उभी स्वाती माझी पुतणी ( जन्म १९५२ ).
आता जो फोटो मी येथे पोस्ट केला आहे, ती ’ती’च गच्ची आहे जिथे तन्वी, मी तुझ्या आईलाही घेऊन येत असे ,,, काळही तोच असावा.( आई चा जन्म कधीचा ? ) फोटोत माझ्या पुढे जो ओटा आहे त्याचे बरोबर खाली कापसे कुटुंबीय म्हणजे तुझी आज्जी रहायची ( हा दुसरा मजला… म्हणजे मुंबईच्या भाषेत 1st floor ). गच्ची तून  खाली उतरायला एक जीना होता व पुढे दिड – दोन फुटाची गॅलरी / पॅसेज तिन्ही बाजूने जेथून खालील चौक ( २०’x२०’) दिसे व परत मोठ्या जिन्याने खाली चौकात येता येत असे. हा मागिल दारचा चौक, असाच पुढील दारी पण होता ! मधे मग पडवी , मधले घर, ओसरी असे, ज्या ओसरीत मोठा झोपाळा होता.
परत फोटो कडे वळतो. तॊ जरा निरखून पहा. तिथे छोटी छोटी मॉडेल्स केलेली आहेत. दोन वा तीन मजली घरे, बाल्कनी असलेली, रस्ता आहे, कॉर्नरचे गोल घर, आहे की नाही छोटी टाऊन्शिप ? तिथे एसटी बस पण आहे , सर्वात मागची लांब बिल्डींग आहे बहुदा सीबीएस ची…त्या पुढे मोटारी !…… गच्चीला मधेच मोठ्ठी थोरली गॅप पडलेली दिसते आहे का?….. ती आहे मधून जाणारी नदी !…. त्यावर एक छोटा पूल ही केलेला आहे बरं का , वर एक मोटार…..दिसतंय का सारे?…. त्यावेळी फोटोग्राफी इतकी adavance  नव्हती… साध्या बॉक्स कॅमेरावर काढलेला आहे हा फोटो.

हा फोटो आहे माझ्या आईचा, श्राध्दाचे लाडू वळतांनाचा…. येथे देण्यचे प्रयोजन ? हे आहे आमचे स्वैपाकघर. त्यावर कापसे कुटुंब राहायचे. डव्याबाजून अर्ध्या भागाचे वर जाळी होती व त्यापुढे होता चौक.

आता हा फोटॊ आहे रंगपंचमीचे दिवशीचा. रंग खेळून झालेला आहे. बजूला आहेत ती सर्व माझी भाचे मंडळी ! मी चौदावा ना…भाचे ही जवळपास माझ्याच वयाचे असणार.

येथे हा फोटो देण्याचा उद्देश… हा आहे चौक, मागे जाळी त्यामागे आमचे स्वैपाक घर व त्यावर रहायची, तन्वी तुझी आज्जी !

पुढे ह्या माझ्या छंदाने मला वेळेला थोडा पैसाही मिळवून दिला, त्याचे वर्णन पुन्हा कधीतरी करीन.

माझी बुक कव्हर्स

26/12/2009 9 comments
माझा एक मित्र आहे त्याचे वडिल कै. लक्ष्मण के. तांबे, त्यांच्या काळातील ते प्रख्यात हस्तसामुद्रिक. अत्यंत शांत धीर गंभीर स्वभाव. मित्राचे घरी गेलो व ते घरी असले तर सतत काहीतरी लिहीण्यात गढून गेलेले असत. ते पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेत ऑफीस सुपरींटेंडेंट होते.  त्यांनी ज्योतिषा वर अनेक पुस्तके लिहीलीत त्यांचे शेवटचे पुस्तक होते ’ साक्षात्कार’. शेवटचे म्हणतोय अश्या साठी , कारण नंतर पुढे ते फार जगले नाहीत. मी त्यावेळी जयपूर येथे होतो. ते काही दिवसांसाठी तिकडे येण्याच्या तयारीत होते, पण येऊ शकले नाहीत.
त्या काळात त्यांचे ’ साक्षात्कार’ चे लिखाण चालू होते. त्यात आत बरीच चित्रे काढायची होती. मी चित्रे काढतॊ म्हटल्यावर ते काम ओघानेच माझ्या कडॆ आले व आतील मी काढलेली खूपशी चित्रे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
पुस्तक जसे संपत आले, एके दिवशी मीच विषय काढला, ” नाना, पुस्तक तर तयार होत आले आहे,  कव्हरा साठी काही ठरवले आहे का? ” तेव्हा त्यांनी
प्रश्नार्थक दृष्टीने माझ्या कडे पाहीले. ” तुम्हाला चालणार असेल तर मी प्रयत्न करतो . “
झाले मी लगेच तयारीला लागलो. एक दोन नमुने दाखवले पण त्यांचे पसंतीस येईना. मी ही थोडा नर्व्हस झालॊ. तेच म्हणाले की काहीतरी नाविन्यपूर्ण कर कि शेल्फ वर आपले पुस्तक उठून दिसायला हवे ! एक दोन दिवस विचारात गेले. काही पुस्तकांची दुकाने ढुंढाळलीत. व मग एक विचार मनात चमकून गेला. मागे मी त्यांचे हाताच्या तळव्याचा ठसा घेतलेला होता.त्या पुस्तकातील स्केचेस साठीच, त्यावरून कल्पना सुचली व खालील कव्हर तयार झाले. हे क्व्हर नानांना एव्हढे आवडले की आधीच्या सर्व पुस्तकावर त्यांनी ते छापून घेतले. पुस्तकांची नावे फक्त आम्ही वेगवेगळी बनवून घेतलीत. हेच ते कव्हर !
हे दुसरे कव्हर ही असेच अचानक करायला मला सांगीतले गेले. तोही माझा जरा उशीरा झालेला मित्रच होता. ह्या आधीची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली होती व त्याची कव्हर्स बाहेरील आर्टीस्ट करून घेतली होती. ह्या नव्या पुस्तकाचे कव्हर मात्र त्याला माझ्याकडूनच हवे होते. हे ते दुसरे कव्हर !
खरं तर हा माझा विषय नव्हता त्यामुळे नंतर मात्र मी कधी त्या फंद्यात पडलॊ नाही. मात्र ही दोन कव्हर्स माझ्या खात्यात जमा होऊन गेलीत !!

टॅग

अपर्णा ने  टॅग केलं, पहील्याने ही काय भानगड समजेच ना, अनेकांना वाट पुसत चाललोय. बघा जमलंय का !

1.Where is your cell phone?
आपटलाय ( बहूतेक भूर्दंड आहे )
2.Your hair?
तेल लावलंय आज ( न्हायलो ना ! )
3.Your mother?
विश्रांती ( वर घेतेय )
4.Your father?
विश्रांती (  अर्थात वरच , जेथे सीता तेथे राघव ! )
5.Your favorite food?
पथ्यंच पथ्य !( कसलं फेवरेट घेऊन बसलाय ! )
6.Your dream last night?
आठवतोय ( सांगतोच आठवल्या आठवल्या )
7.Your favorite drink?
पाणी ( पुण्यातील कार्पोरेशन च्या नळातील शुध्द ! )
8.Your dream/goal?
कुठल्याश्या कलासागरात गटांगळ्या खातोय.
9.What room are you in?
ड्रॉईंग रूम (ड्रॉईंग काढीत बसायला छान नाही ? )
10.Your hobby?
तुम्हाला काढणे ( म्हणजे तुमचे पोर्ट्रेट  काढणे हो )
11.Your fear?
मला माझीच ( आणखीन कोण भिववणार मला ?)
12.Where do you want to be in 6 years?
आहे अस्सेच ! ( बरं आहे ना उगाच कुठे कशाला ? )
13.Where were you last night?
अहो घरीच (रोख नाही कळला ?)
14.Something that you aren’t? diplomatic
मी काहीच नाहीय्ये!
15.Muffins?
काय असते ते?
16.Wish list item?
’त्या’ लाच सांगीन
17.Where did you grow up?
ह्याच जमीनीवर की
18.Last thing you did?
टांगाटांगी
19.What are you wearing?
माझाच चष्मा
20.Your TV?
लोडशेडींग चाललंय (बंद केलाय !)
21.Your pets?
नाही सांभाळत
22.Friends?
तुम्ही सारेच
23.Your life?
मस्त चाललंय !
24.Your mood?
एकदम छान !
25.Missing someone?
अस्सं ?
26.Vehicle?
बजाजसुपर (७८ चे मॉडॆल, अजून हाफ कीक स्टार्ट !)
27.Something you’re not wearing?
चेन ( कोणी गळ्यात बांधून हिंडवतंय सं वाटतं )
28.Your favorite store?
अख्खं जग ( त्यापेक्षा मोठे स्टोअर कुठे आहे ?)
Your favorite color?
सर्वच ( रंगात खेळणे हाच तर माझा छंद )
29.When was the last time you laughed?
Just the  moment !
30.Last time you cried?
पाळण्यात असावा !
31.Your best friend?
निसर्ग
32.One place that you go to over and over?
निसर्गच ! ( जो रंगवायला मला आवडतो )
33.One person who emails me regularly?
कोणी असतंच तर ?
34.Favorite place to eat?
Any place (पण तिथं खायला मिळायला हवं !)

आता कुणाला टॅगू ?

मी काढलेली व्यंगचित्रे

23/12/2009 2 comments

मागिल पोस्ट मधे मी मॅगेझीन सेक्रेटरी म्हणून निवडलो गेलो या बाबतचे वर्णन दिले होते. ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती व ती आपण आता येथे बघुया. प्रत्यक्षात मी पाच चित्रे काढली होती पण प्रयत्न करूनही तूर्त मला तीनच मिळालीत.शेवटी विचार केला तीन तर तीन , तेरा वाजवू या नकॊ ! पुढे मागे मिळालीत तर ह्याच ब्लॉग मध्ये वाढवता येतील. ही सर्व व्यंगचित्रे ’आमचे व्यायाम प्रकार’ या विषयावर होती.

पहिले वर्ष सगळ्यांनाच कॉमन होते. आमच्यातील इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांचे हातात कायम मोठी मोठी पुस्तके असायची. त्यांचे इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी हा तर मोठ्ठा ठोकळाच होता म्हणून ते ’इलेक्ट्रीकल वेटलिफ्टींग” !

आम्ही तेव्हा डिप्लोमाला ऍडमीशन घेतली होती. आमच्या नविन इमारतीस सुरुवात झाली होती पण पुर्ण होण्यास अवकाश होता, तेव्हा आमचे वर्ग इंजिनियरींग कॉलेज मधेच पण दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत असत.  सुरवातीचे एक दोन व शेवटचे काही तास लेक्चर्स व मधल्या काळात प्रॅक्टीकल्स असत. दुपारी एक वाजता म्हणजे जेवून आलेले तर शेवटचे कंटाळा आलेले म्हणून मुले वर्गात चक्क झोपा काढीत असत ती ही ’ क्षणिक निद्रासने !’


आम्ही सिव्हिलचे विद्यार्थी सर्व्हेइंगला निघालॊ की सर्व सामान हातात वागवित व झेंडे वगैरे फडकावित जात असू , तॊ  हा आमचा ’मार्च-पास्ट !!’

अजून एक आठवते आहे ते म्हणजे जुवेलिअन थ्रो म्हणजे भाला फेक , आमची रेंजींग रॉड ची नेहमी फेकाफेकी असे त्याबाबत होते व ….पाचवे तर आठवतही नाहीये  !

माझे लेख !



मी नुकताच पुण्यात शिकायला आलेला होतो. हे लेख , कविता वगैरे पासून तसा मी दूरच होतो. रामदास स्वामीची एक उक्ती आहे की दिवसामाजी काही तरी लिहावे ! कित्येक वेळी मी मनासी ठरवायचो एखादा आठवडा झाला की आळश्याची गाडी मूळ पदावर (… अशीच काही तरी म्हण का काय ते आहे ना? असो ) तेव्हा दोन चार कागद खरडले जायचेत ! आणि ते कुठे वाऱ्यावर उडायचे ते कळायचेही नाही ! मग पुढच्या वेळी वहीवर लिहायचे असे ठरवायचो. काही दिवस नेमाने तारीख घालायचो. ती वहीही कुठे गायब व्हायची…. असो. नंतर एक ६०० पानी नोटबुकच आणले होते त्यासाठी…. पण काय पुढली पाने कोरीच राहून गेलीत !

अशीच कधीतरी आम्हाला कसलीशी तब्बल एक महीन्याची सुट्टी होती. आता मनाचा हिय्या केला ! आणि खरंच तब्बल महीनाभर काही तरी लिहीत राहीलो… बापरे काय अफलातून विषय असायचे एकेक…. राजकारण (…जे कधीच कळले नाही ) तेही येऊन जायचे लेखांतून !….एकदा डोक्यात काही विषयच नव्हता आणि असाच जुनी आलेली पत्रे वाचित होतो. त्यात एक माझ्या भावाने मला लिहीलेलॆ पत्र होते व त्यात पत्र कसे लिहावे/असावे ह्याबाबत एक छानसा डॊस पाजला होता ! पत्राची भाषा कशी कलोक्वीअल असावी…जेणेकरून वाचणाऱ्याला आपण तेथेच आहोत असा भास व्हायला हवा …वगैरे वगैरे… !
ते पत्र मी दोनदा वाचले व माझे एकदम त्यावर विचारमंथन ( फार भारी शब्द वाटतोय ना ? ) सुरू झाले. नंतर मात्र  एक झक्कास लेख… जवळ जवळ एक टाकी लिहून तयार झाला. मी स्वत: तो एक दोनदा वाचला पण फारशी दुरूस्तीची गरज भासली नाही ! हा होता माझा पहिलावहिला लेख व त्याला कारणीभूत झाले, माझ्या भावाचे मला आलेले पत्र! तेव्हाच मी मनाशी ठरवले की हा कुठे तरी प्रसिध्दीला   पाठवायचं ! नंतर हा लेख माझ्या मित्र मंडळींनीही वाचला ! सगळ्यांनी मला दुजोरा दिला. आता हा छापायला कुठे पाठवायचा यावर बराच खल झाला व त्यावेळची प्रथितयश मासिके होती त्यातील एका कडे पाठवला. मात्र त्या मासिकात चक्क लिहीलेले होते की लेख परतीसाठी टपालहंशील पाठवू नये, नापसंत लेख आम्ही परत पाठवत नाहीत ( कारण टेबलाखाली कचरा कुंडी आहेच त्याचा आम्ही मुक्तपणॆ वापर करतो ! ) आणखीन एक दोन मासिकांनाही पाठवला व काही महीने गेले व मी लेख पाठवला होता हे विसरलो नव्हे विसरावेच लागले !

पुढेही कित्येक महिने गेले एक दिवस माझ्या मेव्हण्यांचे पत्र आले त्यात त्यांनी सहज कळवले की त्यांनी माझा एक लेख कुठल्याश्या मासिकात वाचलाय ! त्यांना नाव ही माहित नव्ह्ते मासिकाचे ! बरोबरच आहे ’हौस’ नावाचे मासिक नुकतेच निघालेले होते म्हणून त्यांनाही लेख पाठवला होता ! … मग मी त्या मासिकाच्या ऑफीस मध्ये गेलो तर नावाच्या बोर्डचा पता नाही व ऑफीस बंद ! दोन तिनदा चकरा मारल्या तरी ऑफीस बंदच ! सहजच चौकशी केली अन कपाळावर हातच मारला !

” अहो दोन महीने झाले , दोन तीन अंक निघाले व मासिकच बंद पडले ! काही राहीलेले अंकांचे गठ्ठे रद्दीत विकून मंडळी गायब आहेत !” बाजूच्या एकाने माहीती पुरवली !

पुढे काही दिवस मी बरीच रद्दीची दुकाने पालथी घातली तरी काही मिळेना . एके संध्याकाळी सोमवारी जुनी पुस्तके, मासिके मांडून बसलेली एक व्यक्ती पाहीली. तेथे ह्या हौस मासिकाचे एक दोन अंक होते ते मी विकत घेऊन चाळले पण माझा लेख काही त्यात नव्हता ! तोच म्हणाला  अजून असा अंक पलिकडल्या कडॆ पण आहे तो मी बघीतला आणि काय आश्चर्य त्यात माझा लेख चक्का छापून आलेला होता ! मी लगेच त्या मासिकाचे तिन्ही अंक रद्दीत विकत घेऊन टाकलेत !
मला माहीत आहे की तो लेख तुम्हालाही वाचायचा आहे…. मग वाचा तर.





खरे तर एव्हढ्यावर सारे काही संपणार होते. पण खुमखुमी होतीच ना ! मी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हा अशी ट्रॅडीशन होती की थर्ड इयर सिव्हील इंजीनियरींगचा नेहमी मॅगेझीन सेक्रेटरी असायचा. लगेच आमच्या मित्रमंडळीनी ठराव केला व मला निवडून आणले सुध्दा !
मग अर्थातच माझा त्यात लेख असायला हवाच !  चला तोही येथे देतो …वाचा.
ह्याच मॅगेझीन मध्ये मी काही व्यंगचित्रे ही काढली होती ती आपण बघुया पुढील पोस्ट मध्ये.
Categories: माझे छंद Tags:

कर्दळ

आज गुरूवार म्हणजे पुण्याच्या विद्युत वितरण (अ) व्यवस्थापनाचा कत्तलचा  (म्हणजे विज पुरवठयाचा असणे नसणे या खेळाचा) दिवस ! त्यामुळे जवळपासचे छोटे मोठे कारखानदारांचा आज सुटीचा दिवस असतो. माझे एक स्नेही आहेत. जवळच आंबेगावला त्यांचा वर्कशॉप आहे. बुधवारीच त्यांचा मला हमखास फोन येतो उद्या कुठे जायचे त्यासाठी ! मग त्यांचे गाडीतून लॅंडस्केप साठी आम्ही कुठे कुठे जात असतो.
एकदा त्यांना वर्कशॉप मध्येच काम होते. विज नसली तरी डिलिव्हरी देणे वगैरे काम होण्या सारखे होते. त्यांनी सहज विचारले, वर्कशॉप वर येणार का? पण बघा बुवा तिथे काही स्पॉट मिळेल का बघावे लागेल. मी काय एका पायावर ( त्याचीही गरज नव्हती कारण कार मधूनच जायचे होते.) तय्यार. हे पहा त्या वेळी काढलेले चित्र.
आज मी स्कुटरने त्यांचे घरी गेलो स्कुटर त्यांचे बंगल्यात लावली तेव्हाच बाहेरच्या कर्दळीने माझे लक्ष वेधले होते पण आज आम्ही पाषाणला जायला निघालो होतो.
का कोण जाणे माझे पहिलेच चित्र बिघडले आणि मग मूडच येईना. नंतर एक ब्रश-स्केच व एक पोर्ट्रेट ही  काढले पण तरीही मूड काही आलाच नाही. आज घरी लवकर या अशी त्यांना तंबी असल्याने सारे लक्ष घड्याळाकडॆ लागलेले. मग काम संपवित दोघेही घरी परतलो.
त्यांचे बंगल्यात पाऊल टाकले मात्र, त्या कर्दळीने परत माझे लक्ष खेचलेच ! मग मात्र तिथेच ठिय्या मारीत झटपट कर्दळीला माझ्या कागदावर थबकवले !!


हीच तर जगरहाटी !

16/12/2009 8 comments
एरव्ही सकाळी साडेपाचला उठणारा मी आज साडे सहा वाजून गेले तरी गादीवर लोळत पडलेलो होतो.कारण काही विशेष नव्हते, तसे कालच थोडेसे फिवरीश वाटत होते पाव गोळी क्रोसीन घेतली होती त्याचा तर परिणाम नसावा ! कोण जाणे?
जाग आली ते मोबाईल च्या कर्णकर्कश्श टोनने. कितीदा मुलगी म्हणत असते, ” बाबा इनकमिंगला छान टोन लावून घ्या ना ! ” पण मी मुलखाचा आळशी. फोन तिचाच होता व आमच्या लग्नाच्या वाढदिवसा साठी आमचे अभिनंदन करायला मुद्दामच लवकर केला होता कारण मी नाहीतर हिंडायला बाहेर पडलेला असेन. पण आज मी नेमका घरी सापडलो .
सांगायचे म्हणजे आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस , १६ डिसेंबर १९६८. तो दिवस, त्या दिवसाचा गडबड गोंधळ सारे काही आठवले ! पण खरं तर आज काल आम्हाला कुठलेच दिवस आठवेनासे झालेले आहेत. हल्ली खरंच आमच्या लक्षातही रहात नाहीत ! पण मग मुली असतात ना आठवणी करून द्यायला.
तर हा दिवस आमच्या आयुष्यातील एक घडामोड म्हणून, अन्यथा नेहमी सारखाच तर दिवस आहे की . कुठल्यातरी कार्यालयात दोन घराण्यातील माणसे जमतात. आपापल्या मित्र मंडळीनाही बोलावतात त्यांचे  आशीर्वाद मिळवायला ! पुढे त्या दोन व्यक्ती एकत्र रहाण्याच्या शपथा घेतात. आयुष्यातील राहीलेली वर्षे इमाने इतबारे एकत्र घालवतात. हाच गाडा पुढे चालविण्यासाठी, अपत्ये निर्माण करतात. घासून पुसून त्यांना ह्या जगात पाठवतात व मग पुढील प्रवासाला निघतात. नंतर मात्र हे दोन जीव बरोबर असतीलच असा काही नियम नाही !! तर असा हा दिवस ! म्हणता म्हणता एक्केचाळीस वर्षे झालीत सुध्दा ! कदाचित पन्नाशी उलटलीच तर एखादा छोटासा समारंभ पण होईल. पण मनात विचार येतो, काय फरक पडलेला असेल जगरहाटीत ?
पण नाही काहीतरी फरक सतत पडत असतोच ! ओळखी रिफ्रेश होत रहातात ! नाती जुळतात, मोडतात नवीन जुळत रहातात, नव्याने पुढे येतात. आठवणींची उजळणी होते … आणि ह्यालाच म्हणतात जीवन ऐसे नांव !…प्रत्येकाच्या आयुष्यातील त्याचे स्वत:चे स्थान हा एक केंद्र बिंदू ठरतो व सारे जग त्या भोवती फिरतंय असा भास होत रहातोच की नाही ?
ह्याला पण एक आयाम आहे. जीवनाच्या सुख दु:खांची किनार आहे आणि तोच पुढे जगण्याचा आधारही आहे !
कोण कुठली एखादी तन्वी ह्या हल्लीच्या  इंटरनेट माध्यमामुळे जीवनात प्रवेश करते. एक नवे नाते निर्माण होते. आयुष्यात विस्मरणात गेलेल्य़ा आठवणीचे मोती परत हाती घेऊन येते. परत केंद्र बिंदू सक्रीय होतॊ ! आणि पुन्हा सारे सुरू होते …नव्याने, हीच तर जगरहाटी !

माझी मूर्तिकला

माझ्या मूर्तिकलेला कधी बरे सुरूवात झाली असावी ? मी सहजच आठवत बसलो होतो, पण स्पष्ट पणे काही लक्षात येत नव्हते. पण एके दिवशी मनातल्या मनात एक ललकारी ऐकू येऊ लागली. ” होळी होळीला पांच पांच गवऱ्या ! ” आणि मी एकदम माझ्या लहाणपणात अवतरलो !

असेन बहुदा मी तीन ते पाच वर्षांचा. शाळेत जायला लागलो नव्हतो. मला पक्के आठवते की सहावे लागले आणि मला एकदम दुसरीत घातले होते ! वरील नारे करीत गल्लीतील मुले होळी साठी गवऱ्या, लाकडे जमा करीत असत कींवा पळवापळवी ही करीत. आमची होळी दादा ( म्हणजे माझे वडील) सकाळी पुढील चौकात सोवळे नेसून करीत असत. नैवेद्याला हमखास पुरणाची पोळी असायचीच. हॊळीची तयारी अर्थातच मलाच करावी लागे. विशेष फुलाचा पुडा उघडून तबकात वेगवेगळी करणे, गंध उगाळून ठेवणे, होळीचे साहित्य जुळवणे इ.इ. अजून एक विशेष गोष्ट माझ्यावर सोपवलेली असे ती म्हणजे गुळा चे प्राणी म्हणजे साप,विंचू,इतर किटके आदि करून ठेवणे ! ज्यांचा नंतर होळीच्या ज्वालात स्वाहाकार होत असे ! माझ्यातल्या मूर्तिकाराचे बीज तेव्हाच अंकुरले असावे, कारण मी बनविलेल्या विंचवाला बघून ” हं लक्ष दे चावेल ” असे एकदा मला दादा म्हणाल्याचे स्मरते ! मी खूप मनलावून ते प्राणी बनवायचो, कारण पुढे वर्षभर असे प्राणी आपल्याकडे फिरकत नाहीत अशी आमची समजूत करून दिलेली असायची. अर्थात उरलेला गूळ गट्टम करायला मिळायचा हा फायदा असायचाच ! त्याची तजविज गूळ घेतानाच घेतली जायची ! आत्ता मला जाणवते की बहुदा माझ्यातल्या नव्याने अंकुरणाऱ्या मूर्तिकलेला ती दाद /शाबासकीच असावी.

पुढे पाचवीत आम्हाला हस्तव्यवसायासाठी वेगळ्या शिक्षकाची नेमणूक व वेगळा तास मिळू लागला. पेठे विद्यालयात त्यावेळी रानडे आडनावाचे शिक्षक होते व ते शाळेच्या अगदि जवळ रहात . शिवाय आमची त्यांचेशी घरगुती ओळख असल्याने मी त्यांचे कडे नेहमी जात असे कारण मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. दर गॅदरींगला ते माझ्याकडून काहीतरी वेगळे बनवून घ्यायचे. एका वर्षी आम्ही धरणाची प्रतिकृती केली होती. त्यासाठी धरणाचे पोटात बोहोरी आळीतील गांगल टिनमेकर कडून टिन चा ट्रफ बनवून घेतला होता व त्यात खरे खुरे पाणी साठवून धरणातून पडते असे ते दृश्य केले होते. सरांनी त्याला भरपूर मदत क्र्ली होतीच. पण ट्रफ ची कल्पना माझी होती म्हणून सरांनी माझी पाठ थोपटली होती. शिवाय कागदाचा लगदा करून त्याच्याही काही काही वस्तू बनवल्या होत्या. तेव्हा जे केले ते शेवटचे पुन्हा त्या वाटेला जाईल अशी मला स्वत:लाही सुतराम शक्यता वाटली नव्हती.

पण पुढे त्याचे असे झाले मी डीप्लोमाला गणितासाठी नारायणपेठे तील देशपांडे सरांचा क्लास लावला होता. क्लासला मागिलबाजूने जिन्याने जावे लागे, त्याच्या पलिकडील वाडा मूर्तिकार गोखल्यांचा होता व जातायेता ते गणपती करतांना दिसायचे. एकेदिवशी हिय्या करून गेलो व मला शिकवाल का असे विचारले. त्यावेळी रंगकाम सुरू होते, आधी हे रंगकाम शिकायला या व नंतर पुढील वर्षी मातीकाम शिका असा सल्ला दिला व त्यानुसार आमच्र रंग काम सुरू झाले. एखादे वेळी एखाद्या गणपतीचे काम करीत असतांनाही ते दिसत असत तेव्हढेच ! पुढे क्लास सुटला व आमचे तेथे जाणेही बंद झाले !

असेच कुठलेसे एक मूर्तिचे प्रदर्शन पाहून आलॊ व मनात त्याचेच विचार घुटमळत होते त्याच तिरीमिरीत बाजारातून शाडू मातीचे पोतेच घेऊन आलो. (आजही घरात पडून आहे ! कधी मूड यॆईल सांगता थोडेच येणार ) नंतर ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीतून संबधित पुस्तके आणली व माझा मीच अभ्यास सुरू केला. त्यावेळी बऱ्याच लहान मोठ्या मूर्ती घडत गेल्या. व व्यक्त व्हायचा अजून एक मार्ग मला सांपडला !

सोबत मी केलेल्या काही मूर्तींचे फोटॊ देत आहे.

ही तरूणी हातात पुजेचे साहित्य घेऊन निघाली आहे.  हा  statue  जे जे स्कूल ऑफ आर्टच्या दर्शनी प्रवेश दालनात आहे. मला त्याचा एक फोटॊ मिळाला होता त्यावरून केला.

वरील चारही फोटोज मी केलेल्या एकाच मूर्तीचे निरनिराळ्या कोनातील आहेत

वरील दोन्ही मूर्ती आता राहील्या नाहीत ! राहील्यात त्या आठवणी व फोटो.

वरील गणपती व हरताळिकांच्या मूर्ती ह्या आम्ही सध्याच्या सोसायटीत रहायला आल्या नंतर च्या वर्षी म्हणजे १९८६ च्या सुमारास बनवल्या होत्या. अख्ख्या सोसायटीतील महिलांनी त्या पुजिल्या होत्या, नंतर अर्थात त्यांचे विसर्जन केले. माझ्या कडॆ राहील्या त्या आठवणी व हे फोटो.

Follow

Get every new post delivered to your Inbox.